जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२१ । जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरातील एका १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आली. रितेश गुलाबराव मोरे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, या विद्यार्थ्याने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रितेश गुलाबराव मोरे असे मृताचे नाव आहे.
याबाबत असे की, शहरातील हरीविठ्ठल नगरात रितेश मोरे हा आपल्या आई वडील व भावासोबत राहतो. दरम्यान, रितेश मोरे याची आई व भाऊ असे दोघेजण काल शुक्रवारी धुळे येथे नातेवाईकांकडे गेले होते. वडील गुलाबराव सुकलाल मोरे सुरक्षारक्षक असल्याने ते रात्रपाळीसाठी ड्युटीवर गेले होते. शुक्रवारी रात्री रितेश हा एकटाच घरी होता. घरातच त्याने साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी सात वाजता वडील गुलाबराव मोरे ड्युटीवरुन घरी आले तेव्हा दार ठोठावून देखील रितेश प्रतिसाद देत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी शेजारी राहणाऱ्या काही नातेवाईकांना बोलावून घेतले. घराचा दरवाजा तोडल्यानंतर रितेश गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. हे दृष्य पाहून वडील गुलाबराव मोरे यांना जबर धक्का बसला.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आलेल्या रामानंदनगर पोलिसांनी व नागरीकांनी रितेश याला खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर दुपारी दोन वाजता पिंपळकोळा (ता. एरंडोल) या मूळगावी रितेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत रितेश याच्या पश्चात आई-वडील, एक विवाहित बहिण व लहान भाऊ आकाश असा परिवार आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रवीण जगदाळे व मनोज वानखेडे प्राथमिक तपास करीत आहेत.