⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

सावद्यात सामूहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२२ । स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, राज्यात १७रोजी सकाळी ११ वाजता, सामूहिक राष्ट्रगीत गायन आयोजित करण्यात आले होते. यावेळी जे जिथे असाल तिथेच उभे राहून या उपक्रमात सहभाही होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार सावदा नगरपालिकेत सामूहिक राष्ट्रगीत झाले, यावेळी मुख्याधिकारी किशोर चव्हाण, कार्यालयातील सर्व कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

विविध शाळा व संभाजी चौक, दुर्गामाता चौक, यासह अनेक ठिकाणी याच वेळी सामूहिक राष्ट्रगीत झाले, यावेळी पालिकेतर्फे पालिकेवरील भोंगा वाजून सर्वांना सूचना देण्यात आल्यावर सर्वत्र एकाच वेळी हे राष्ट्रगीत झाले. याच वेळी येथील पालिके जवळील स्वातंत्र्य सैनिक यांचे फलकास देखील मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होऊन एक विक्रम प्रस्थापित करावा असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात सध्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत वेगवेगळे अभिनव उपक्रम संपन्न होत आहेत. राज्यातही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन सुरू केले आहे. या महोत्सवांतर्गतच, ‘सामूहिक राष्ट्रगीत गायन’ ही अभिनव संकल्पना पुढे आलेली आहे. राज्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या उत्साहात या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले होते, त्याला राज्यभरात उत्तम प्रतिसाद मिळाला असून एक देशभक्तीची ज्वाजल्य उदाहरण पुन्हा दिसून आले.

नागरिकांच्या मनात आपल्या राष्ट्रगीताविषयी असणारी पवित्र भावना सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या माध्यमातून एका अनोख्या विक्रमाद्वारे साऱ्या जगासमोर आली आहे, या उपक्रमाला मूर्त स्वरूप देण्यासाठी लहान-थोर, स्त्री-पुरुष असा कोणताही भेद न ठेवता सर्वांनी या उपक्रमात सहभाग घेतल्याचे दिसून आले नागरिकांनी ज्या ठिकाणी असतील, त्या ठिकाणी राष्ट्रगीताचा सन्मान ठेवून या उपक्रमात सहभाग घेतला होता.