महाराष्ट्रात थंडीचा कडाका पुन्हा वाढणार ; वाचा हवामान खात्याचा ‘हा’ अंदाज..

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२३ । राज्यातील अनेक ठिकाणी फेब्रुवारीमध्येच उन्हाचा पारा 35 वर गेला आहे. दिवसा उन्हाच्या झळा वाढत असल्याचे दिसून येत असून दुपारी उन्हाचा चटका तर रात्री आणि पहाटे थंडीचा कडाका असे चित्र आहे. आणखी दोन दिवस उन्हाची तीव्रता अधिक राहणार असून त्यानंतर पुन्हा गारवा जाणवणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात सध्या कोकण, मुंबई, ठाणे, मराठवाड्यासह विदर्भात कमाल तापमानात सरासरीपेक्षा 3 ते 4 अंशांनी वाढ झाली आहे. राज्यात मागच्या 24 तासांत नांदेड व धुळ्यात 37, परभणी 36.8, पुण्यात 36.4, जळगावात 36.5 तर औरंगाबादेत 36 अंश तापमानाची नोंद झाली. राज्यात अचानक कमाल तापमानात वाढ झाली आहे. यामुळे फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा बसत आहेत.

मात्र दोन दिवसानंतर राज्यात गारवा पसरण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवातामुळे वातावरणात सतत्याने बदल होत आहेत. बुधवारपासून जम्मू- काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात हिमवृष्टी आणि पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे दोन दिवसांनंतर पुन्हा राज्यातील वातावरणात गारवा पसरण्याची शक्यता आहे.

राज्याच्या किमान तापमानात हळूहळू वाढ होत आहे राज्याच्या किमान तापमानातील वाढीबरोबरच आणि किमान तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यात मागच्या 24 तासांत विविध शहरात तापमानाची झालेली नोंद
पुणे 35.2 (12.2), जळगाव 35.7 (10.7), धुळे 37.0 (12.0), कोल्हापूर 33.6 (19.5), महाबळेश्वर 31.6 (17.6), नाशिक 36.3 (13.2), सांगली 35.2 (12.2), सातारा 34.7 (15.0), सोलापूर 36.4 (18.6), सांताक्रुझ 36.1 (19.4), डहाणू 31.4 (17.5), रत्नागिरी 33.1 (20.0), औरंगाबाद 35.4 (13.8).

परभणी 35 .7(16.0), अकोला 38.5(15.6), अमरावती 36.8(14.9), बुलडाणा 35.0(18.2), ब्रम्हपुरी 36.3 (16.5), चंद्रपूर 35.2 (17.3), गडचिरोली 33.6 (14.6), गोंदिया 34.2 (14.5), नागपूर 35.9 (15.0), वर्धा36.5 (16.4), वाशिम 36.2 (15.0), यवतमाळ 36.2 (16.5).