मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम महत्वाकांक्षी योजना ; अर्ज करण्याचे आवाहन
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । महाराष्ट्र शासनाने राज्यातील शहरी व ग्रामीण सुशिक्षीत युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेवुन उद्योजकतेला चालना देणारी सर्व समावेशक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या नावाने महत्वाकांक्षी योजना सन 2019 -20 पासून राज्यात जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग मंडळ या कार्यालया मार्फत राबविण्यात येत आहे.
सदर योजना कायदेशिररित्या पात्र असणारे उत्पादन व सेवा उद्योग व्यवसायासाठी आहे. सदर योजनेत कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी ज्यांचे वय 18 वर्ष पुर्ण अधिकतम मर्यादा 45 वर्ष (अनुसुचित जाती/जमाती/महिला/ अपंग/माजी सैनिक यांच्या साठी 5 वर्ष शिथिल ) पात्र राहतील. सदर योजनेसाठी शैक्षणिक पात्रता 1) रुपये 10.00 लाखावरील प्रकल्पासाठी 7 वी उत्तीर्ण व 2) 25 लाखावरील प्रकल्पासाठी 10 उत्तीर्ण अशी आहे. तसेच अर्जदाराने यापुर्वी शासनाच्या कोणत्याही अनुदानावर आधारीत स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा ( कोणत्याही योजनेत अनुदान घेतलेले नसावे) सदर योजनेत अर्जदारांना उत्पादन व्यवसायासाठी ( उदा. बेकरी उत्पादन, पशुखादय निर्मिती, फॅब्रिकेशन इ.) रु. 50 लाख पर्यतच्या प्रकल्पासाठी अर्ज करता येईल व सेवा उद्योग व्यवसायासाठी ( उदा. सलुन, रिपेअरिंग व्यवसाय, ब्युटी पार्लर इ.) रु. 10 लाखपर्यंत अर्ज करता येईल. या योजनेत अनुसुचित जाती/ जमाती/ महिला/ अपंग/ माजी सैनिक या प्रवर्गातील अर्जदारा शहरी भागासाठी बँकेने मंजुर केलेल्या प्रकल्प किंमतीच्या 25 % अनुदान व ग्रामीण भागासाठी 35 % अनुदानासाठी पात्र असेल, त्यासाठी त्यांना स्वगुंतवणुक 5 % करावी लागेल. उर्वरीत सर्व प्रवर्गातील अर्जदार हा शहरी भागासाठी 15% व ग्रामीण भागासाठी 25% अनुदानासाठी पात्र असेल. या लाभार्थ्यांना 10% स्वगुंतवणुक करावी लागेल. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करावा.