जळगाव लाईव्ह न्यूज| ७ ऑगस्ट २०२३। चाळीसगावला बदली झालेल्या अधिकाऱ्याला जळगावला येण्याबाबत मुंबईहून आदेश असतानाही त्याला येता आले नाही. याला आरोग्य विभागातील अधिकारीच जबाबदार असल्याच्या संशयावरुन दोघांमध्ये घमासान हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ४) घडली.
चाळीसगाव येथे सिकलसेल समन्वयक म्हणून जबाबदारी दिलेल्या अधिकाऱ्याला जळगाव येथे बदली हवी होती.
त्यासाठी मुंबईतून थेट आरोग्य विभागाकडून तत्कालीन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांना आदेश प्राप्त झाले होते. मात्र संबंधित अधिकाऱ्याची चाळीसगावला बदली का करण्यात आली, याचे ठोस कारण आणि स्पष्टीकरण डॉ. आशिया यांनी मुंबईत आयुक्तांना पाठविले होते. त्यानुसार या सिकलसेल समन्वयकाची चाळीसगावहून जळगावला बदली झाली नाही. याला आरोग्य विभागातील जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जबाबदार असल्याचा संशय होता.
संशयावरुन त्याने शुक्रवारी सायंकाळी सहानंतर ड्युटी संपल्यावर कार्यक्रम व्यवस्थापक हे दूध फेडरेशनच्या दिशेने घरी जायला निघाले होते. तेव्हा शिवाजीनगर पुलापासून ते सुरेशदादा जैन यांच्या घरापर्यंत दुचाकी आडवी लावून वाद घातला. दोघांची यथेच्छ हाणामारी होवुन डोके फुटले. हे प्रकरण पोलिसांतही गेले, मात्र आपसात वाद मिटवण्यात आला.