खळबळजनक : जळगाव जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंक रिकामा : रुग्ण सिलेंडरवर
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२१ । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ऑक्सीजन टॅंक सायंकाळी साडे सात वाजेपासून पूर्णपणे संपला असून रुग्णालयातील रुग्ण सध्या सिलेंडर व्यवस्थेवर अवलंबून आहेत. दरम्यान, ऑक्सिजन टँकर पारोळाजवळ असल्याचे सांगण्यात येत असून वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे सर्व अधिकारी, कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कोविडग्रस्त नागरिकांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालयात सध्या ३५० रुग्ण उपचार घेत असून त्यात दहा बालकांचा समावेश आहे. रुग्णालयातील ऑक्सीजन टॅंक आज सायंकाळी ७.३० वाजता पूर्णपणे संपला आहे. रुग्णालय प्रशासनाकडून आपत्कालीन व्यवस्थेसाठी ठेवण्यात आलेल्या सिलेंडरद्वारे ऑक्सिजन पुरवठा सुरू करण्यात आला असून त्यापाठोपाठ आणखी सिलेंडर राखीव ठेवण्यात आलेले आहेत.
दरम्यान, ऑक्सिजन घेऊन येत असलेला टँकर सध्या पारोळा जवळ असल्याचे सांगण्यात येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप वैद्यकीय अधीक्षक संगीता गावीत, ऑक्सिजन समितीचे डॉ.संदीप पटेल, संजय चौधरी यांच्यासह सर्व डॉक्टर आणि कर्मचारी प्रत्येक कक्षात लक्ष ठेऊन आहेत.
जिल्हा प्रशासनाकडून याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नसून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व लक्ष ठेऊन आहेत.
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/1180426329046451/