जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२४ । उद्या म्हणजेच ७ सप्टेंबर रोजी गणरायाचे घरोघरी आगमन होणार असून लाडक्या बाप्पासाठी लागणारे चांदीचे आभूषण घेण्यासाठी जळगावच्या सराफ बाजारात भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. बाप्पाचा उत्सव आनंदात साजरा करण्यासाठी नागरिक चांदीचे आभूषण खरेदी करत आहेत.
गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अबालवृद्धा आतुरले आहेत. बाप्पाच्या आगमनावेळी आणि पुढील दहा दिवसांतील पूजेत कोणतीची कमतरता नसावी यासाठी भाविक काळजी घेत आहे. काही हौशी भक्तांनी गणरायाला चांदीची आभूषण करण्याचा संकल्प यंदा पूर्ण केला आहे. जळगावच्या सराफ बाजारात बाप्पाला लागणाऱ्या चांदीचा मोदक, दूर्वा, मुकुट, गळ्यातील माळ, चांदीचा जास्वंदाचे फुल, पान, जानव अशा वेगवेगळ्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
लाडक्या बाप्पासाठी नागरिक जळगावच्या सराफ बाजारातून वेगवेगळ्या चांदीच्या वस्तू खरेदी करताना पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदा चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षापेक्षा तब्बल २० हजार रुपयांनी चांदीचे भाव वाढलेले असताना सुद्धा लाडक्या बाप्पासाठी नागरिक चांदीचे आभूषण खरेदी करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे जळगावच्या सुवर्णनगरीत सुद्धा मोठ चैतन्याचं वातावरण पाहायला मिळत आहे.
चांदीच्या बाप्पाला पण मागणी
दरवर्षी प्रमाणे अनेक भाविकांनी राज्यात चांदीच्या गणपतीची खरेदी केली आहे. लहान, मध्यम आणि मोठ्या चांदीच्या मूर्तींना मोठी मागणी आली आहे. चांदीच्या दुर्वा, दुर्वांचा हार, जास्वंदीचे फुल, हार, विडा, सुपारी, मोदक, मोदकांची रास, तुळस, तुळशी वृदांवन, केवड्याचे पान, निरांजणी, दिवा, पंचपाळे, बाजबूंद, उंदिरमामा, पाट, ताम्हण, गडवा, पेला, तक्क्या, पळी यासारख्या चांदीच्या आभूषणांना मोठी मागणी आहे.