जळगाव जिल्हा

दिव्यांगांच्या हातांनी उजळले चिमुकले श्रीराम मंदिर, दिवाळीच्या पूर्वसंध्येला ११५१ दीप प्रज्वलित

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ नोव्हेंबर २०२१ । सर्वत्र दिवाळीचा उत्साह सुरू असतांना दिव्यांग, गतिमंद मुलांनी देखील सामाजिक भावना जपत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने दीपोत्सव साजरा केला आहे. रुशील मल्टिपर्पज फाऊंडेशन संचलित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातर्फे दिवाळीच्या पूर्वसंध्येला चिमुकले श्रीराम मंदिरात ११५१ दीप प्रज्वलित करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर जयश्री महाजन, ह.भ.प.दादा महाराज जोशी, भाजप गटनेते भगत बालाणी, डॉ.स्नेहल फेगडे, सुप्रीम कंपनीचे अनिल काबरा, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, डॉ.आदित्य माहेश्वरी, धनराज कासट, मनिषा पाटील, विनोद शिरसाळे आदींसह उडानचे सदस्य, दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते.

उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातर्फे बुधवारी चिमुकले श्रीराम मंदिरात सायंकाळी ६ वाजता दिवाळी पूर्वसंध्या उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमात दिव्यांग बालकांनी ११५१ तेलाचे दिवे प्रज्वलित केले. त्यानंतर महाआरती होऊन कोरोनाचे संकट टळून पुन्हा सुखमय दिवस येऊ दे, असे प्रभू श्रीरामचंद्रांना साकडे घालण्यात आले.

प्रास्ताविक करताना उडानच्या संचालिका हर्षाली चौधरी यांनी उपक्रमाची माहिती दिली. उडानच्या दिव्यांग मुलांनी दिवाळीसाठी अनेक आकर्षक वस्तू साकारल्या. काही वस्तूंना नामांकित मॉल, सुपर शॉपमध्ये विक्रीसाठी स्थान मिळाले. आजच्या दिवसाचे औचित्य साधत अगरबत्तीचा ३६ वा सुगंधित फ्लेवर बाजारात आणण्यात आला. दिव्यांगांच्या पंखांना बळ देण्यासाठी असेच नवनवीन उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खऱ्या अर्थाने दिवाळी पावली – महापौर
दिव्यांग विद्यार्थ्यांनी अनेक आकर्षक वस्तू साकारल्या आहेत. आज दिवाळी पूर्वसंध्या उपक्रम साजरा करताना विद्यार्थ्यांनी दाखवलेली शिस्त कौतुकास्पद होती. आजची दिवाळी खरोखरच आगळीवेगळी होती. प्रभू श्रीरामचंद्रांच्या साक्षीने कोरोनामुक्तीसाठी प्रार्थना करून दिवाळी पावली, अशी बोलकी प्रतिक्रिया महापौर जयश्री महाजन यांनी दिली.

श्रीराम मंदिराची केली साफसफाई
उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातर्फे सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांनी चिमुकले श्रीराम मंदिर परिसराची साफसफाई केली. संपूर्ण मंदिर परिसर स्वच्छ करीत मंदिर परिसराची शोभा वाढवली. उपक्रमासाठी डॉ.रोहन चौधरी, डॉ.जयश्री कळसकर, प्रवीण चौधरी, चेतन वाणी, सोनाली भोई, जयश्री पटेल, अनिता पाटील, मीनल कोल्हे, भूषण नेवे, अन्नपूर्णा राठोड आदींनी परिश्रम घेतले.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Related Articles

Back to top button