⁠ 
रविवार, मे 5, 2024

खडसेंच्या बालेकिल्ल्यात आज मुख्यमत्र्यांची सभा, काय बोलणार यावर जिल्ह्याचे लक्ष

जळगाव लाईव्ह न्यूज ।२० सप्टेंबर २०२२ । संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाची जोरदार बांधणी सुरू झाली आहे. या साठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. आता जळगाव जिल्ह्यात पक्ष बांधणीसाठी शिंदे अग्रेसर झाले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंच्या मुक्ताईनगरमध्ये शिंदेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यामुळे आता या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलतात या कडे सर्वांचच लक्ष आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज मुक्ताईनगर येथे जाहीर सभा होणार आहे. यातच एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. मुक्ताईनगर शहरातील क्रीडा संकुलाच्या मैदानामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. त्यामुळे, एकनाथ खडसेंच्या बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदे काय बोलतील? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

कारण शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्या नंतर विधानसभेत केलेल्या पहिल्या भाषणात एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते कि, मुक्ताईनगरात शिवसेना उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख हे खडसेंच्या दहशतीमुळे. दाखल झालेल्या केसेसमुळे सहा महिने बाहेर लपून बसले होते. आता आपले सरकार आले असल्याने घाबरू नका. यामुळे मुक्ताईनगर मध्ये होणाऱ्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्की काय म्हणतात? हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे.