⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

जन्मत: दोन्ही हात नसलेल्या खान्देशातील ८ वर्षाच्या चिमुकल्याला मुख्यमंत्र्यांचा सलाम

जळगाव लाईव्ह न्यूज | ७ जुलै २०२३ | जन्मतःच दोन्ही हातांनी साथ सोडली असली, तरी नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील एक ८ वर्षाच्या चिमुकल्याने जिद्दीची कास कधीही सोडली नाही. एका पायात पेन धरत शिक्षण पूर्ण करण्याचं स्वप्न उराशी बाळगून तो आपल्या यशाची कहाणी लिहत आहे. गणेश अनिल माळी (वय वर्ष ८) (Ganesh Anil Mali) त्याचं नाव. वडील शेतमजूर आहेत तर मुलगा गणेश हा जन्मतः दोन्ही हातांनी दिव्यांग अशा बिकट परिस्थितीत देखील गणेश आपले शिक्षण आपल्या पायांच्या आधारे पूर्ण करत आहे. त्याच्या जिद्दीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार प्रताप सरनाईक यांनीही सलाम ठोकला आहे. मुख्यमंत्र्यांनी चिमुकल्या गणेशला कॅडबरी देत ५ लाखांच्या आर्थिक मदतीचा धनादेश देखील दिला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील असलोद गावात राहणारा गणेश माळी, वय अवघ ९ वर्ष असलेला गणेश इयत्ता ३ री मध्ये शिकत आहे. जन्मापासूनच दोन्ही हात नसलेल्या गणेशच्या कोवळ्या वयातही त्याच शिक्षण आणि खेळातील अभिरुचीला त्याचा अपंगत्व थांबू शकले नाही. काही दिवसापूर्वी गणेशला अपंगत्व आहे त्याला मदत करा असे आर्जव करत त्याचे वडील त्याला मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्याकडे घेऊन आले होते. परंतु सदर आजार मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये बसत नसल्याने मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घालून दिली.

मुख्यमंत्र्यांनी लगेचच गणेशची संपूर्ण जबाबदारी घेतली पहिल्या टप्प्यामध्ये ५ लक्ष रूपयाचा धनादेश त्यांच्या वडिलांकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच लवकरच त्याला कृत्रिम हात बसवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी गणेशला मुख्यमंत्री शिंदे यांनी “मोठा होऊन काय बनायचं आहे?” असा प्रश्न विचारला असता गणेशने “मला मोठं झाल्यावर आर्मीमध्ये भरती व्हायचा आहे आणि दुश्मनांना गोळ्या घालायच्या आहेत” असे सांगितले यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी गणेशचं आर्मीमध्ये भरती होण्याच स्वप्न पूर्ण होईपर्यंत त्याच्या पाठीशी उभे राहणार असल्याचा शब्द दिला. यावेळी त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर पायाने संपूर्ण त्याचे नाव लिहून दाखवले.

मुख्यमंत्र्यांनी गणेशच्या जिद्दीचे कौतुक करून त्याला त्याच्या उपचारासाठी ५ लाख रुपयांचा धनादेश दिला. त्याच्या सोबत गप्पा मारत त्याला एक कॅडबरी देखील दिली. यावेळी आमदार प्रताप सरनाईक देखील त्यांच्या काही कामानिमित्ताने वर्षा बंगल्यावर पोहचले. यावेळी त्यांची योगायोगाने चिमुकल्या गणेश सोबत भेट झाली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री व आमदर सरनाईक या दोघांनी फेसबूक पोस्ट लिहित चिमुकल्या गणेशचे कौतूक केले आहे.

जन्मत: दोन्ही हात नसलेला गणेश शारीरिक व्यंगावर मात करत इयत्ता तिसरीचे शिक्षण घेत आहे. पायाच्या बोटात पेन धरून लिखाण करणे, जेवणे, कपडे परिधान यांसारख्या कृती तो सहज साधतो. भविष्यात उत्तम करिअर करण्याचा त्याचा मानस आहे. हे पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार सरनाईक खूपच भारावले. याबाबत त्यांनी त्यांच्या फेसबूक पेजवर एक भावनात्मक पोस्ट लिहित गणेशचे कौतूक केले आहे. ही पोस्ट मंगेश चिवटे यांनी देखील शेअर केली आहे.

काय म्हटलं आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पोस्टमध्ये…

अनंत आमची ध्येयासक्ती
अनंत अन आशा
किनारा तुला पामराला..
कवी कुसुमाग्रज्यांच्या या ओळी काल मला आठवल्या कारण
नंदुरबार जिल्ह्यातील असलोद येथील तिसर्‍या इयत्तेत शिकणार्‍या गणेश माळी या चिमुकल्याने काल वर्षा या निवासस्थानी येऊन माझी भेट घेतली.
हा चिमुकला दोन्ही हातांनी दिव्यांग आहे. त्याला भेटून त्याची शिक्षणाप्रती आवड आणि जिद्द बघायला मिळाली. पायाच्या बोटात पेन धरून तो जिद्दीने लिखाण करतो. तसेच जेवणे, कपडे परिधान हेही काम गणेश पायांनी करतो अशी माहिती गणेशचे वडील विलास माळी यांनी मला दिली. यावेळी गणेशच्या या जिद्दीचे कौतुक करून त्याला त्याच्या उपचारासाठी ५ लाख रुपयांचा धनादेश दिला.
याप्रसंगी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, प्रथमेश गुलाबराव पाटील महाराष्ट्र राज्य विस्तारक (शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष) हे उपस्थित होते.

काय म्हटलं आहे, आमदार प्रताप सरनाईक यांच्या पोस्टमध्ये…

‘असे म्हणतात लहान मुलांकडून प्रेरणा घेण्यासारखे खूप काही असते अश्याच एका दैवी चमत्काराची प्रचिती आज आली. काल मुख्यमंत्र्यांचे निवास स्थान म्हणजेच वर्षा बंगल्यावर गणेश अनिल माळी, वय वर्ष ८ याच्याशी योगायोगाने भेट झाली. नंदुरबार जिल्ह्यातील असलोद गावाचे हे कुटुंब असून वडील शेतमजूर आहेत तर मुलगा गणेश हा जन्मतः दोन्ही हातांनी अपंग अशा बिकट परिस्थितीत देखील गणेश आपले शिक्षण आपल्या पायांच्या आधारे पूर्ण करत आहे. त्याच्या जिद्दीला, एकाग्रतेला आणि संघर्षवृत्तीला माझा सलाम.’