⁠ 

सावदा रेल्वे स्टेशनवर रासायनिक खतांचा माल धक्का होणार ; जिल्हाधिकारी

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२१ । सावदा रेल्वे स्टेशनवर रासायनिक खतांचा माल धक्का तयार व्हावा यासाठी सहकार्य करणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत म्हणाले आहे. तसेच केळी महामंडळ स्थापनेसाठी प्रयत्न सुरू असून त्यासाठी लोकप्रतिनिधी, शेतकऱ्यांच्या तालुकास्तरावर बैठका घेऊन आराखडा तयार करण्यात येईल असेही ते म्हणाले.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राऊत शनिवारी सावदा येथे आले होते. यावेळी विश्रामगृहात पत्रकारांनी त्यांची भेट घेतली. ते म्हणाले की, केळी महामंडळासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी मध्यंतरी शासकीय पातळीवरील बैठक घेतली. या संदर्भात आपण जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसह तालुकास्तरावर स्वतंत्र बैठकी घेऊन तयार झालेला आराखडा लोकप्रतिनिधींच्या बैठकीत ठेवू. नंतर केळी महामंडळ स्थापनेचा निर्णय होईल, असे सांगण्यात आले.

सावदा रेल्वे स्थानकावर रासायनिक खतांचा धक्का व्हावा, यासाठी खत कंपन्या व रेल्वे प्रशासनामध्ये ताळमेळ घडवून आणणे सुरू आहे. मात्र, शेडचा प्रश्न आहे. तो देखील लवकरच मार्गी लावू. नजीकच्या काळात सावदा येथे रासायनिक खतांचा मालधक्का सुरू होईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

केळी उत्पादकांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन

केळी उत्पादकांचे उत्पन्न वाढवणे, बाजार भावांवर नियंत्रण, केळीला बाजारपेठ उपलब्ध करून देणे, प्रोसेसिंग युनिट उभारणे, केळी निर्यातीसाठी शेतकऱ्यांना पतपुरवठा केळी कामगारांचे हित जोपासणे, केळीच्या चांगल्या जाती निर्माण करणे, करपा व सीएमव्ही रोगांवर संशोधन करणे, केळी कार्यशाळा, चर्चासत्रातून शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक ज्ञान पोहोचवणे असा महामंडळ स्थापनेमागील हेतू आहे.