जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२३ । सध्या टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहे. देशातील अनेक भागांमध्ये टोमॅटोच्या किरकोळ किंमती 200 रुपये किलोपर्यंत वाढल्या आहेत. ते आवाक्यात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केलं जात आहे. अशातच टोमॅटोचे वाढलेले भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
केंद्राने बुधवारी सहकारी संस्था नाफेड आणि राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ (NCCF) यांना आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून टोमॅटो खरेदी करण्याचे निर्देश दिले. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी प्रमुख ग्राहक केंद्रांवर कमी दराने टोमॅटोचे वाटप केले जाणार आहे.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, उद्या म्हणजेच १४ जुलैपासून टोमॅटो दिल्ली-एनसीआरमधील ग्राहकांना किरकोळ दुकानांमधून कमी दराने विकले जातील. राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (NAFED) आणि राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ (NCCF) टोमॅटो खरेदी करतील.
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ज्या ठिकाणी किरकोळ किमती गेल्या एका महिन्यात राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहेत अशा ठिकाणी कमी किमतीत टोमॅटोचे वितरण केले जाईल. मंत्रालयाने सांगितले की ज्या ठिकाणी टोमॅटोचा वापर जास्त आहे, त्यांना वितरणासाठी प्राधान्य दिले जाईल.
जुलै-ऑगस्टमध्ये टोमॅटोचे उत्पादन कमी होते
जुलै-ऑगस्ट आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टोमॅटोचे उत्पादन कमी असते, असेही मंत्रालयाने म्हटले आहे. याशिवाय जुलैमध्ये पावसाळ्यामुळे वाहतुकीशी संबंधित अडचणींमुळेही दर वाढले आहेत.