चोरांचा कहर : एकाच रात्री पाच दुकाने फोडली
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२२ । बोदवड तालुक्यातील जामठी येथे येथे चोरट्यांनी एका रात्री पाच दुकाने फोडत हजारो रुपयांचा ऐवज लांबवल्याने व्यापार्यांमध्ये भीती पसरली आहे. पाचही दुकानातून सुमारे 72 हजारांचा ऐवज लांबवल्याची माहिती आहे.
एकाचवेळी पाच दुकाने टार्गेट
जामठी येथे शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी बस स्थानकावरील पाच दुकानांना टार्गेट केले. बसस्थानक परीसरातील अमोल प्रोव्हीजनमधून 14 हजारांची रोकड तसेच पाच हजार रुपये किंमतीचे सीसीटीव्हीचे डीव्हीआरख, सुका मेवा लांबवल्याची माहिती दुकान मालक काशीनाथ गुलाबचंद तेली यांनी दिली. याच दुकानासमोरील कुणाल भगवान महाजन यांच्या महाजन कृषी केंद्रातील 21 हजार 600 रुपयांची रोख रक्कम तसेच सुरेंद्र उमरावसिंग पाटील यांच्या साई राणा कृषी केंद्रातून पाच हजारांची रोकड व पाच हजार रुपये किंमतीचा सीसीटीव्ही डीव्हीआर चोरट्यांनी लंपास केला तसेच ग्राहक सेवा केंद्रातील संदीप विठ्ठल महाजन यांच्या मालकीच्या दुकानातून आठ हजारांची रोकड तसेच पाच हजार रकमेचा डीव्हीआर चोरट्यांनी लांबवला व सदगुरु जनरल स्टोअर्समधून अडीच हजारांची रोकड तसेच साडेसात हजार रुपये किंमतीच्या वायर तथा कॉस्मेटिक पावडर व इतर साहित्य लंपास करण्यात आले.
पोलिसांनी केली पाहणी
बोदवडचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी सहकार्यांसह पाहणी केली. जळगाव येथील श्वान पथकाला ही पाचारण करण्यात आले. जंजीर नावाच्या श्वानाने प्रत्येक दुकानात जाऊन चोरट्यांच्या ठशाची रेकी केली. बोदवड पोलिस स्थानकात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, चोरटयांनी आपली छबी सीसीटीव्हीत कैद होवू नये यासाठी सीसीटीव्हीचा डीव्हीआरही लांबवला आहे.