⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

यावलातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या गणवेशात बदल, पालकांत असंतोष

Yawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी अचानक आणि तेही शैक्षणिक वर्ष संपण्याच्या मार्गावर असतानाच गणवेशात बदल करण्याचा तालिबानी निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकात व तालुक्यात तीव्र असंतोष व्यक्त करण्यात येत आहे.

यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनीसाठी आपण शैक्षणिक वर्ष संपण्याच्या मार्गावर असतानाच अचानक गणवेशात बदल करून तालीबानी निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे म्हणणे आहे “बेटी बचाओ बेटी पढाओ” परंतु आपण या घोष वाकयाला “छेद” घातल्याचे वाटते. कारण आपण अचानक गणवेश बदल केल्याने विद्यार्थ्यांना ८०० ते ९०० रूपयाचा आर्थिक भुर्दंड बसणार आहे. तसेच मुलींसाठी पंजाबी ड्रेसकोड न करता सूट पॅन्ट ड्रेस कोड केल्याने आश्चर्य वाटते. त्या प्रमाणे मुलांना पण आर्थिक झळ बसेल. गणवेश ठराविक ठिकाणाहून / दुकानातून किंवा कॉलेजमधूनच घ्यावा, अशी अट पण टाकण्यात आली असल्याचे कॉलेज मधील मुला-मुलींसह त्यांच्या पालकात चर्चा आहे. आपली ज.जि.मराठा विद्या प्रसारक संस्था जिल्हास्तरीय आहे.

जिल्हयात इतर शाळा, कॉलेजमध्ये गणवेश ड्रेसकोड लागू नसताना फक्त यावलच्या ऐतिहासिक तथा महर्षी व्यासाच्या यावल नगरीत इंग्रजी विदेशी गणवेश,ड्रेसकोड लागू करणे म्हणजे भारतीय संस्कृतीला विसंगत असे आहे. ड्रेस कोड लागू करतांना सर्व स्तरातील मुला, मुलींना गणवेश लागू करून सर्वांसाठी सर्व जाती धर्मातील मुला-मुलींसाठी समान नियम लागु करणार आहात का? इत्यादी अनेक प्रश्न यावल शहरासह तालुक्यात उपस्थित होत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून लागू केलेला ड्रेस कोड (गणवेश) आठ दिवसात रद्द करावा, अशी मागणी यावल तालुका भीम आर्मीने समाजाचे अध्यक्ष निलेश भोईटे व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान, दखल न घेतल्यास भिम आर्मी संघटने तर्फे आपल्या कॉलेज समोर (फैजपूर रोडवर) आंदोलन छेडले जाईल, असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. भीम आर्मीचे तालुकाध्यक्ष प्रविण बाळु डांबरे, सचिन पारधे, अशोक बंडू तायडे. बबलु गनी, रोहीत सोनवणे, निलेश सपकाळे, आकाश बिर्हाडे, सोहन गजरे, करण अडकमोल यांनी आपली स्वाक्षरी करून नमूद केले आहे.