मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री केलं, चंद्रकांतदादाच्या वक्तव्याने चर्चा
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२२ । गेली अडीच वर्ष सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकरला शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीमुळे पायउतार व्हावं लागलं. यानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपचे नवीन सरकार स्थापन केलं आहे. या नवीन सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. मात्र, मुख्यमंत्रीपदावरून भाजपमधील खदखद समोर आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपण मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केलं, असं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. आज पनवेलमध्ये आयोजित भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे.
“केंद्रातील नेत्यांनी आदेश दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) झाले. मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री केलं. आपल्याला दुःख झालं. पण आपण दुःख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे हाकायचा होता.
जेव्हा पासून शपथ घेतली तेव्हा सर्व मुंबईत आहेत त्यामुळे आता चला आपल्या घरी कामाला लागू जेव्हा सर्व ठरेल तेव्हा तुम्हाला बोलावलं जाईल आणि तेही वेळेत. नगरपालिका, पालिका निवडणुक लागली आहे. आपल्या मुंबई महापालिका जिंकायची आहे. आगामी काळात आपण खूप परिश्रम घेऊ.नेत्यांनी आदेश करायचा नसतो इच्छा व्यक्त करायची असते आणि आपण त्याच पालन करायचं असतं, असं आवाहनही यावेळी चंद्रकांत पाटलांनी उपस्थित नेत्यांना केलं आहे.