⁠ 
गुरूवार, जुलै 25, 2024

चाळीसगाव @ MH-52 : आ.मंगेश चव्हाणांच्या प्रयत्नांना यश!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २६ फेब्रुवारी २०२४ | चाळीसगाव शहरात स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करावे, अशी मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी शासन दरबारी केली होती. गेल्या अनेक वर्षापासून लागून असलेल्या मागणीच्या पाठपुराव्याला यश आले असून लवकरच याठिकाणी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कार्यान्वित होणार आहे. जळगाव वाहन पासिंगला मिळणारा एम.एच.१९ हा क्रमांक असून चाळीसगावला एम.एच.५२ हा क्रमांक दिला जाणार आहे.

जळगाव जिल्ह्याचा विस्तार वाढतच असून वाहनांची संख्या देखील वाढत आहे. जळगावपासून चाळीसगाव जवळपास १०० किलोमीटर असून छत्रपती संभाजीनगर, नाशिक व धुळे या चार जिल्ह्यांच्या सीमेवरील चाळीसगाव तालुक्यातील वाहनधारकांना नवीन वाहनांचा परवाना काढण्यासाठी जळगावला यावे लागते. बऱ्याचदा आरटीओ विभागातर्फे भडगाव, पाचोरा व पारोळा येथे कॅम्प घेतले जात असले तरी काही ना काही कामानिमित्ताने बहुतांश वाहनधारकांना जळगावच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क करावा लागत होता.

नागरिकांची गैरसोय टाळावी म्हणून चाळीसगावला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व्हावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून लागून होती. या संदर्भात आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पत्र देऊन संपूर्ण जिल्ह्याचा भार जळगावच्या एकमेव कार्यालयावर असल्याने चाळीसगावला उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची गरज लक्षात आणून दिली होती. मागणीची मुख्यमंत्री शिंदे यांनी दखल घेत, तत्काळ मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करावा, असे आदेश संबंधितांना दिले होते.

आ.मंगेश चव्हाण यांच्या मागणीला यश आले असून चाळीसगाव येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यास मंजुरी मिळाली आहे. कार्यालयासाठी जागा, संबंधित अधिकारी, कर्मचारी, वाहन उपलब्ध करण्याबाबत आदेशात सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. कार्यालय कार्यान्वित झाल्यानंतर वाहनांना पासिंग करताना एम.एच. ५२ हा क्रमांक मिळणार आहे.