जळगाव लाईव्ह न्यूज । पाचोरा तालुक्यातील वरखेडी गावात राहणारी 27 वर्षीय आरती समाधान पाटील या विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना 13 फेब्रुवारी रोजी समोर आली आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आरती यांनी टोकाचं पाऊल उचललं असून आरतीने आत्महत्येपूर्वी आपल्या मोबाईलमध्ये ध्वनी संदेश रेकॉर्ड करून तिच्यावर अन्याय करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे स्पष्टपणे उच्चारली आहेत.

आरती पाटील या चाळीसगाव येथील सॅटीन क्रेडिट केअर नेटवर्क लिमिटेड कंपनीत ॲसिस्टंट ब्रँच मॅनेजर पदावर कार्यरत होत्या. मात्र, त्याच कार्यालयातील कर्मचारी प्रिन्स कुमार, कपिल वाडपत्रे आणि आकाश कुऱ्हेकर हे सतत तिचा मानसिक छळ करत होते. आकाश कुऱ्हेकर याने आरतीच्या विश्वासाला तडा देत तिच्यासोबत गैरवर्तन केले आणि तिला सातत्याने ब्लॅकमेल करून शारीरिक संबंधासाठी दबाव टाकत होता. जेव्हा आरतीने त्याच्या मागण्यांना ठाम नकार दिला, तेव्हा या त्रिकुटाने तिला कामावरून काढून टाकले.
आरतीने 27 जानेवारी 2025 रोजी चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती, मात्र आकाश कुऱ्हेकरला ही बाब समजल्यानंतर त्याने आरतीसोबत काढलेले फोटो आणि व्हिडीओ पाठवून तिला बदनाम करण्याची धमकी दिली. या धक्क्याने घाबरून आरतीने तक्रार मागे घेतली. मानसिक आणि शारीरिक छळ सुरूच राहिल्याने शेवटी तिने आपल्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
ही घटना समोर आल्यानंतर पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. आरतीच्या कुटुंबीयांसह संपूर्ण गावाने दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेने महिलांच्या कार्यस्थळी सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.