जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ डिसेंबर २०२४ । भारतात सायबर फसवणुकीच्या घटना झपाट्याने वाढत असून सायबर ठग सतत नवनवीन ट्रिक शोधून लोकांना लक्ष्य करतेय. अशातच जळगावतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सैन्य दलात औषध साठ्याची आवश्यकता असल्याचे सांगून एका अनोळखी व्यक्तीने सुनील भिवसन चौधरी (वय ५५, रा. सुदर्शन भवन, चाळीसगाव) यांना ६ लाख ७ हजार ७०० रुपयात ऑनलाइन गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शनिवारी सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीनुसार, सुनील चौधरी यांना २३ नोव्हेंबर रोजी एका अनोळखी व्यक्तीने मोबाइलवरून संपर्क साधला. मी चाळीसगाव ग्रेस अकॅडमी मिलिटरी डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगून आमच्या डिपार्टमेंटला औषधांची आवश्यकता आहे, त्यानुसार तुम्ही औषधी पाठवा, असे सांगितले.
अशी केली फसवणूक औषधांची यादी मिळाल्यावर संशयिताने ‘फोन पे’वरून दहा रुपये पाठविण्यास सांगितले. चौधरी यांनी दहा रुपये पाठविल्यावर ठगाने त्यांना २० रुपये पाठविले. त्यानंतर सुनील चौधरी यांचा मुलगा जयदीप याला त्यांच्या मोबाइलच्या फोन पे अॅपमधील इंटर क्रेडिट कार्ड डिटेल्स, बँकेचे नाव व १ लाख ३९ हजार ५८० रुपयांचा तपशील पाठविण्यास सांगितले. त्यानंतर ठगाने चौधरी यांच्या बँक खात्यातून ६ लाख ७ हजार ७०० ऑनलाइन काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर चौधरी यांनी प्रथम चाळीसगाव नंतर जळगावला सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.