⁠ 
रविवार, ऑक्टोबर 27, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | बाळासाहेबांच्या बाळकडूमुळे शिवसेनेचा आज वटवृक्ष ; ना. गुलाबराव पाटील

बाळासाहेबांच्या बाळकडूमुळे शिवसेनेचा आज वटवृक्ष ; ना. गुलाबराव पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२१ । एक नेता, एक झेंडा आणि एक विचार या ध्येयावरून चालण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या बाळकडूमुळे आज शिवसेनेचा वटवृक्ष झाल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त तालुक्यातील म्हसावद येथे आयोजीत पक्षाचा मेळावा व सदस्य नोंदणी अभियानात ना. पाटील बोलत होते. या कार्यक्रमात त्यांनी साध्या शिवसैनिकापासून ते आज मंत्रीपदापर्यंतच्या वाटचालीतील महत्वाचे टप्पे उलगडून सांगतांना आठवणींना उजाळा दिला.*

आज शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. याचे औचित्य साधून तालुक्यातील म्हसावद येथे आज पक्षाचे मेळावा आणि सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करतांना ना. गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेच्या वाटचालीबाबत सविस्तर विवेचन केले.

पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील म्हणाले की, साधारणपणे १९८५च्या आसपास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांनी प्रेरीत होऊन आणि शिवसेनेत कार्यरत झालो. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा त्यांचा मूलमंत्र प्रमाण मानून लाखो शिवसैनिक पक्षात सक्रीय झाले. आज ५५ वर्षानंतर शिवसेनेचा वटवृक्ष झाल्याचे आपल्याला दिसत असून यासाठी बाळासाहेबांनी दिलेले बाळकडू हे उपयुक्त ठरले आहे. शिवसेना हा राजकीय पक्ष वा संघटना नसून समाजहिताचा एक विचार आहे. आज उध्दव साहेब ठाकरे यांच्या माध्यमातून शिवसेना राज्याचे नेतृत्व करत असल्याची बाब ही अतिशय अभिमानास्पद अशीच आहे. शिवसेनेने आजवर अठरापगड जातीतील कार्यकर्त्यांना मोठे केले. माझ्या सारख्या सामान्य शिवसैनिकाला लाल दिवा दिला यापेक्षा अजून महत्वाची बाब काय असू शकते ? मात्र राजकारणात यशस्वी होत असतांना समाजसेवेचा बाळासाहेबांनी दिलेला मूलमंत्र आम्ही विसरलो नाही. यामुळे ५५ व्या वर्धापन दिनाला शिवसेना हा पक्ष आपल्या विचारांवर ठाम असून आत्मविश्‍वासपूर्वक वाटचाल करत आहोत. शिस्तबद्ध, वचनबद्ध,सेवाभावी व  नामर्दांना वाव नसणारी एकमेव स्वाभीमानी संघटना म्हणजे शिवसेना असून याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, शिवसेनेच्या वर्धापन दिनी आपण सदस्य नोंदणी उपक्रम सुरू केला आहे. यात तालुका प्रमुखांनी  तालुक्यातून पंधरा  हजार शिवसैनिकांच्या नोंदणीचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचा संकल्प  केला आहे. याच सोबत म्हसावद-बोरनार गटातील विविध कामांना गती देखील देण्यात येत आहे. म्हसावदच नव्हे तर परिसरातील हजारो नागरिकांना वरदान ठरणार्‍या उड्डा पुलाचे काम काही काळ रखडले होते. मात्र याच्या पुढील टप्प्यासाठी ३३ कोटींचा निधी प्राप्त झाला असून हे काम लवकरच सुरू होणार आहे. तसेच ग्रामीण रुग्णालयाचेही काम सुरू होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी महिला आघाडीच्या जिल्हा संघटक महानंदाताई पाटील यांनी  जास्तीत जास्त महिलांनी शिवसेनेत सामील होण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक महानंदा ताई पाटील, उपजिल्हा संघटक नरेंद्र सोनवणे, पं. स. सभापती नंदलाल पाटील, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, उपसभापती संगीताताई चिंचोरे, उपतालुका प्रमुख धोंडू जगताप, सरपंच गोविंदा पवार, सं.गा.योजनेचे तालुका अध्यक्ष रमेश पाटील, विभाग प्रमुख सुरेश गोलांडे, विजय आमले, नारायण चव्हाण, सुनील बडगुजर , पंकज धनगर, महेंद्र राजपूत, चांदसर सरपंच सचिन पवार, विष्णू आप्पा चिंचोरे,  हौसीलाल परदेशी, शे अहमद शहा, मीनाताई चिंचोरे, समाधान चिंचोरे, ऍड शीतल ताई चिंचोरे, परिसरातील अनिल पाटील, गोरख पाटील, विश्वनाथ मंडपे, सुनील मराठे, यांच्यासह महासावद बोरणार जिल्हा परिषद गटातील शिवसेना, युवासेना, व अंगीकृत संघटना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

वर्धापन दिन कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. शितल ताई चिंचोरे यांनी केले तर सूत्रसंचालन शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण यांनी केले तर आभार सभापती नंदलाल पाटील यांनी मानले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.