⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

जळगावातील ‘त्या’ शिवसैनिकाची वरूण सरदेसाईंनी नाशकात घेतली भेट – काय आहे किस्सा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२१ । अनेक पक्षांमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळतोच असे नाही. बऱ्याचदा नवख्या आणि पब्लिसिटी बहाद्दर चमकोगिरी करणाऱ्या काही लोकांमुळं पक्षश्रेष्ठींना निष्ठावंतांचा विसर पडतो. मात्र शिवसेनेची युवा शाखा असलेल्या युवासेनेचे राष्ट्रीय सचिव वरुण सरदेसाई मात्र निष्ठावंत कार्यकर्त्याला विसरले नाहीत.

त्याचं झालं असं की वरुण सरदेसाई ६ ऑगस्ट रोजी  जळगावच्या दौऱ्यावर होते. दौऱ्यावर असतांना त्यांना युवासेनेचे जिल्हाध्यक्ष प्रीतेश ठाकूर नजरेस पडले नाहीत. त्यांनी ‘काही नवख्या’ कार्यकर्त्यांकडे विचारणा केली असता ठाकूर यांना आमंत्रण दिलं असल्याचं सांगितलं गेलं. मात्र असं काही आमंत्रण ठाकूर यांना मिळालं नाही अशी माहिती सूत्रांकडून जळगाव लाईव्ह न्यूजला मिळाली.

सरदेसाईंकडून प्रीतेश ठाकूर यांची नाशिकमध्ये भेट
वरुण सरदेसाईंसारख्या उमद्या नेत्यानं मात्र ही गोष्ट लक्षात ठेवली. आणि त्यांनी नाशिकात पोहचल्यावर प्रीतेश ठाकूर यांना बोलावून घेतले. नाशिकमध्ये सरदेसाई आणि ठाकूर या दोघांचीच बराच वेळ चर्चा झाली. या चर्चेचे काही फोटो देखील व्हायरल झाले. या भेटीनंतर प्रीतेश ठाकूर यांनी फेसबुक पोस्ट लिहित सरदेसाईंचं आभार मानलं. त्यांनी म्हटलंय की,  मनासारखा नेता, नेत्या सारखं मन.. युवासेना राष्ट्रीय सचिव मा. वरुण जी सरदेसाई साहेब यांच्या सोबत नाशिक येथे भेट झाली. अतिशय आपुलकीने विचारपूस करून गुरू, मार्गदर्शक, मोठे भाऊ, नेते या सर्व भूमिका अत्यंत मनापासून निभवणारे सरदेसाई साहेब हे खऱ्या अर्थाने नेते आहेत. सर्व सामान्य कार्यकर्त्याच्या कामाची व प्रसंगी अडचणीची जाणीव ठेवून पाठीशी उभे राहून बळ देणारे नेते लाभण हीच भाग्याची गोष्ट आहे. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामाची शाबासकी आहे, असं ठाकूर यांनी म्हटलं आहे.

युवासेनेला बळकटी देण्यात प्रीतेश ठाकूर यांचं मोठं योगदान
जळगाव जिल्ह्यात युवासेनेला बळकटी देण्यात प्रीतेश ठाकूर यांचं योगदान खूप मोठं आहे. ते जळगाव जिल्ह्याचे पहिले युवासेनेचे जिल्हाध्यक्ष. ठाकूर यांनी युवकांची मोट बांधत जळगाव शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत युवासेनेचं जाळं पसरवलं. अभ्यासू आणि विनम्र स्वभावाचे ठाकूर युवकांमध्ये यामुळं लोकप्रिय आहेतच शिवाय सामान्य माणसांमध्येही त्यांच्याबाबत आपुलकीची भावना आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून व्यावसायाच्या निमित्तानं ते राजकारणापासून दूर गेलेले पाहायला मिळतात. व्यावसायाच्या निमित्तानं नाशिक-जळगाव असा प्रवास असल्यानं ते संघटनेच्या कामातही सध्या दिसत नाहीत. मात्र त्यांनी संघटनेसाठी केलेलं काम पक्षश्रेष्ठींपर्यंत निश्चितच पोहोचलं असावं. आणि म्हणूनच वरुण सरदेसाईंनी जळगाव दौऱ्यात त्यांची आठवण काढली आणि नाशिकला गेल्यावर खास त्यांची भेट देखील घेतली. यामुळं प्रीतेश ठाकूर पुन्हा संघटनेच्या कार्यात आधीसारखेच नव्या जोमानं उतरतील अशीही अपेक्षा आहे.

जळगावात देखील जुन्या जाणत्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावललं जात असल्याची तक्रार काही कार्यकर्ते खाजगीत करत असतात. मात्र शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याप्रति असलेल्या निष्ठेमुळं ते ‘नव्यांच्या’ चमकोगिरीचा जास्त ताण घेत नाहीत. ते आपापल्या पद्धतीनं संघटनेचं काम करत राहतात. आता प्रीतेश ठाकूर यांची वरुण सरदेसाईंनी भेट घेतल्यामुळं जळगावातील जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना मात्र नवी उर्जा मिळालीय हे नक्की….