मोठी बातमी ! एकनाथ खडसेंसह त्यांच्या लेकी विरोधात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

मार्च 30, 2026 2:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२६ । राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. साखर कारखाना सुरू करण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांची जमीन खरेदी केल्याचा आरोप करत एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा खडसे यांच्याविरोधात बोदवड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

eknath khadse

नेमकं प्रकरण काय?

२००२ मध्ये भुसावळ तालुक्यातील मानपूर शिवारात सहकारी साखर कारखाना उभारण्याच्या नावाखाली काही शेतजमिनींची खरेदी करण्यात आली होती.यामध्ये गट क्रमांक १२२ ही महार वतनाची शेतजमीन मानपूर येथील चमेलाबाई तुकाराम तायडे आणि त्यांच्या वारसांच्या मालकीची होती. जमीन खरेदीच्या वेळी तायडे कुटुंबाला योग्य मोबदला देण्याचे तसेच प्रस्तावित तापी-पुर्णा सहकारी साखर कारखान्यात रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. याच अनुषंगाने तायडे कुटुंबाला एकनाथ खडसे यांच्याकडून ५१ हजार रुपये आगाऊ देखील मिळाले होते. त्यानंतर तायडे कुटुंबातील सदस्यांचे अंगठे घेऊन बोदवड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीचा व्यवहारही पूर्ण करण्यात आला होता. मात्र, उर्वरित रक्कम मिळावी, यासाठी तायडे कुटुंबाने वारंवार पाठपुरावा करूनही त्यांना पूर्ण मोबदला देण्यात आला नाही.

2025 मध्ये कुटुंबाने या जमिनीची माहिती काढली असता, ही जमीन कारखान्याच्या नावावर नसून शारदा एकनाथ खडसे यांच्या वैयक्तिक नावावर असल्याचे समोर आले. खरेदीखतामध्ये जिथे ‘तापी-पूर्णा शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज’ असे नाव होते, तिथे खाडाखोड करून ‘शारदा एकनाथ खडसे’ असे नाव लिहिल्याचे निष्पन्न झाले. यानंतर तायडे कुटुंबाने रिपाइं (आठवले गट) जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या मदतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली.

जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीअंती चमेलाबाई तायडे यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस ठाण्यात एकनाथ गणपत खडसे, शारदा एकनाथ खडसे, मध्यस्थ सुधाकर पाटील आणि दुय्यम निबंधक कार्यालयातील तत्कालीन अधिकारी-कर्मचारी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला असून संबंधित कागदपत्रांची छाननी केली जात आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा जमीन व्यवहार आणि वतन जमिनींच्या खरेदी-विक्रीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील तपासात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories