जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जानेवारी २०२२ । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वेगवेगळ्या भागात जमावबंदी लागू करण्यात आली असून पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आधीच दिला होता.असं असतानाची काल गुरुवारी जामनेरमध्ये भाजपनं मोर्चा काढला होता. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गिरीश महाजनांसह (Girish Mahajan) अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आता गिरीश महाजन यांच्यासह 11 कार्यकर्त्यांवर नेमकी काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
वीज पुरवठ्यापासून वंचित राहत असल्यानं सरकारचा निषेध करण्यासाठी गिरीश महाजन आणि भाजप कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. आधीच राज्यासह जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. असे असतानाही जमावबंदी आदेशाला केराची टोपली दाखवत मोर्च्याच्या आयोजनामुळे आमदार गिरीश महाजन यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकप्रतिनिधीकडूनच कोरोना नियमांचे पालन केले जात नाहीय. बहुतांश वेळा राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांना कोरोना नियमांचे पालन होत नसल्याचे समोर आले आहे. लोकप्रतिनिधी आणि राजकारणीच जिल्ह्यातील कोरोनाचे सुपर स्प्रेडर असून पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी त्यांनी आतापासून पाऊले उचलणे आवश्यक आहे.
दरम्यान, आधीही जळगावात मोर्चा काढल्याप्रकरणी गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल झालेला होता. फक्त गिरीश महाजनच नव्हे तर त्यांच्यासह तब्बल 125 जणांविरोधात जळगावातील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात जमावबंदीचं पालन न केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाजप कार्यकर्त्यांनी आमदार गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आंदोलन केलं होतं. त्यामुळे तेव्हाही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.