⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

गांजा तस्करीतील तरुणीची कारागृहात रवानगी

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ फेब्रुवारी २०२२ । भुसावळच्या रेल्वे स्टेशनवर पुरी-गांधीधाम एक्स्प्रेसमधून खाली उतरलेल्या दोघांकडील गाठोड्यात २० किलाे गांजा आढळला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या २० वर्षीय युवतीची पाेलिस कोठडी शुक्रवारी संपली. यामुळे न्यायालयात हजर केल्यावर तिला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

१३ फेब्रुवारीला भुसावळात पुरी-गांधीधाम एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातून तीन जण दाेन गाठाेडे घेऊन खाली उतरले. गस्तीवरील पोलिसांना संशय आल्याने त्यांनी चौकशी केली. या गाठाेड्यात कपडे असल्याचे एक मुलगा व एका मुलीने सांगितले. मात्र, पोलिसांनी गाठोडे उघडून पाहिल्यावर त्यात गांजांची पाकिटे होती. यावेळी तिघांपैकी एक जण पसार झाला. पोलिसांनी मुद्देमालाचे वजन केल्यावर गांजा २० किलो असल्याचे समोर आले. नागपूर येथून आलेला हा गांजा भुसावळात वितरणासाठी आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यातील होशंगाबाद येथील मुलगा अल्पवयीन असल्याने बालसुधारगृहात रवाना करण्यात आले. तर २० वर्षीय संजना नावाच्या मुलीला पोलिस कोठडी मिळाली होती. ही कोठडी संपल्यावर शुक्रवारी तिला न्यायालयीन कोठडी मिळाली. नंतर जिल्हा कारागृहात रवानगी झाल्याचे पाेलिस निरीक्षक विजय घेरडे यांनी सांगितले.