गुरूवार, सप्टेंबर 21, 2023

‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ अभियान राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जळगाव लाईव्ह न्यूज| १९ ऑगस्ट २०२३। जिल्ह्यात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान राबविण्यात यावे‌, अशा सूचनाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी (ता. १८) दिल्या. दिव्यांग कल्याण अभियानाची आढावा बैठक शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा समाजकल्याण अधिकारी विजय रायसिंग, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता भारत चौधरी, तसेच अभियानाचे सदस्य उपस्थित होते.

श्री. प्रसाद म्हणाले, की ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ या अभियानाचे जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे ९ सप्टेंबरला आयोजन करण्यात यावे. या कार्यक्रमाची परिपूर्ण तयारी करण्यात यावी. या कार्यक्रमांचे नियोजन करताना पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता दिव्यांग लाभार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

शासनाच्या इतर विभागांच्या अधिकाऱ्यांनी दिव्यांग लाभार्थ्यांना दिलेल्या लाभाची यादी दिव्यांग विभागाकडे सादर करावी. कार्यक्रमाच्या दिवशी दिव्यांग व्यक्ती हा ४० टक्के ते ६० टक्केच्या आतील असावा, वयोवृद्ध व लहान मुले, तसेच अतितीव्र दिव्यांग यांना बोलविण्यात येऊ नये, अशा सूचनाही जिल्हाधिकारी प्रसाद यांनी केल्या.

श्री. प्रसाद म्हणाले, की दिव्यांग लाभार्थी यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी आणण्यासाठी तालुकास्तरावरून नगर परिषद मुख्याधिकारी, गटविकासाधिकारी यांनी आपल्या स्तरावरून वाहनव्यवस्था करून दिव्यांग लाभार्थींना कार्यक्रमस्थळी पोचविणे व घेऊन जाण्याची जबाबदारी घ्यावी.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सदर अभियानाच्या दिवशी दिव्यांग लाभार्थ्यांना त्या दिवशी यूडीआयडी देण्याची व्यवस्था करावी. कार्यक्रमाचे परिपूर्ण नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.