मोहीम : भुसावळ पालिका आजपासून सील करणार तब्बल ४०० गाळे
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२२ । मार्चअखेर आल्यानंतर भुसावळ पालिकेने थकीत वसुलीला वेग दिला असून शुक्रवारपासून थकबाकीदार असलेल्या गाळ्यांना सील लावण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. पालिकेची सुमारे पाच लाखांची थकबाकी न भरणार्या सुमारे 400 गाळ्यांना सील लावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पालिकेचे शहरातील वेगवेगळ्या व्यापारी संकुलामध्ये १२०० गाळे आहेत. या गाळे धारकांकडून भोगवटा कर वसूल केला जातो. दरवर्षी ही कर मागणीची रक्कम सरासरी ४० लाखांपर्यंत असते. मात्र, अनेकांनी वर्षानुवर्षे हा कर भरलेला नाही. त्यामुळे चालू मागणी व मागील थकबाकी मिळून १ कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा भोगवटा कर थकीत आहे. यापैकी ४० लाखांची वसुली झालेली असली तरी ६० लाख येणे आहेत. आता मार्चअखेर-मुळे कर वसुली वाढलेला दबाव पाहता पालिकेने कारवाई हाती घेतली आहे.
पहिल्या टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल, दीनदयाल नगर जवळील व्यापारी संकुल, कपडा मार्केटमधील व्यापारी संकुल, डी.एस.हायस्कूल बाहेरील व्यापारी संकुल, जळगाव रोडवरील व्यापारी संकुलातील थकबाकीदारांच्या गाळ्यांना सील ठोकण्यात येईल. यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्या मार्गदर्शनाखाली चेतन पाटील, वैभव पवार, राजू चाैधरी, गाेपाळ पाली, जय पिंगाणे यांचे पथक नियुक्त केले आहे.
व्यत्यय आणल्यास गुन्हा दाखल होणार
थकबाकीदारांच्या दुकानांना सील ठोकण्याची प्रक्रिया सुरू असताना काेणीही त्यात अडथळा आणल्यास शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करावा, अशी सूचना अधिकाऱ्यांनी पथकाला दिली.