जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२२ । पॅरोल रजेवर बाहेर आलेले कैदी कारागृहत न जात पळून गेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत यावल पोलिसांत दोन कैद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल शहरातील एका व तालुक्यातील डांभूर्णी येथील कैद्याविरोधात नाशिक मध्यवर्ती कारागृह प्रशासनाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
यावल शहरातील आरीफ खाटीक हा आरोपी नाशिक मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. 2020 मध्ये कोरोनाची तीव्रता वाढल्याने पॅरोलची मंजुरी देऊन 8 मे 2020 रोजी त्याला 690 दिवसांच्या रजेवर सोडण्यात आले. मध्यंतरी त्याची रजा वाढवून देण्यात आली होती. त्याच्या पॅरोल रजेचा कालावधी 2 जून 2022 रोजी संपल्याने त्याने नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्वतःहून हजर होणे अपेक्षित होते मात्र तो अद्यापही हजर झाला नाही शिवाय यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील आरोपी सोपान शामराव कोळी याला देखील 8 मे 2020 रोजी पॅरोल रजेवर सोडण्यात आले होते. त्याचीही मुदत 2 जून 2022 रोजी संपली होती. तो देखील हजर झाला नाही. या दोघांविरूद्ध नाशिक मध्यवर्ती कारागृहाचे पोलिस कर्मचारी सूर्यकांत पाटील यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार बालक बार्हे, नरेंद्र बागुले करत आहे. पॅरोल रजा संपल्यानंतरही, कारागृहात न परतणार्या दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.