⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

Call 112 : केव्हाही, कुठेही अवघ्या काही क्षणात पोलिसांची मदत पोहचविणारी सेवा ‘डायल ११२’

जळगाव लाईव्ह न्यूज । रजत भोळे । आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळवण्यासाठी सर्वप्रथम आठवणारा नंबर म्हणजे १०० ( एक शून्य शून्य ) कुठं भांडणतंटा झाली म्हणजे १०० या नंबर वर कॉल करून या आधी पोलिसांची मदत मिळवण्यात येत होती. पण आता या नंबर वर कॉल करूनही तुम्हाला पोलिसांचं कोणतही सहकार्य लाभणार नाही. घाबरून जायचं कारण नाही फरक फक्त इतका आहे कि या नंबरमध्ये बदल करण्यात आला आहे हे तुम्हाला माहित आहे का? आता तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांची मदत कशी मिळणार हा प्रश्न तुम्हांला पडला असेल तर त्याचे उत्तर आहे डायल ११२.

नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत सर्व मदत एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, म्हणून देशभरात एक अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला. संकटात असलेल्यांच्या मदतीसाठी काही महिन्यांपूर्वी ११२ हा क्रमांक राज्यात कार्यान्वित झाला आहे. काही नागरिक ‘१००’ क्रमांकावर फोन करीत असल्याने ते कॉल ‘११२’ क्रमांकावर वळवून त्यांना मदतीचा हात देण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी ‘१००’ क्रमांकाऐवजी ‘११२’ क्रमांकावर संपर्क साधल्यास त्यांना तत्काळ मदत मिळणे शक्य होते. ‘११२’ क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर तो कॉल कोठून करण्यात आला आहे, हे समजते. त्यामुळे संबंधिताला त्वरित मदत देण्याची कार्यवाही केली जाते.

नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत मिळावी, यासाठी पूर्वी ‘१००’ क्रमांकावर हेल्पलाइन चालू करण्यात आली होती. याशिवाय अग्निशमन, आरोग्य मदत, महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी विविध हेल्पलाइन सुरू करण्यात आल्या आहेत. या सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात, यासाठी केंद्र सरकारने देशभरासाठी ‘११२’ हा एकच क्रमांक कार्यान्वित केला. पूर्वी ‘१००’ क्रमांकावर फोन आल्यानंतर त्वरित प्रतिसाद देणे काही ठिकाणी पोलिसांना शक्य होत नव्हते; तसेच फोन करणाऱ्या व्यक्तीचे ठिकाणही समजत नव्हते. ‘११२’ क्रमांकावर फोन केल्यांतर त्या व्यक्तीने कोणत्या शहरातून फोन केला आहे, हे त्वरित समजते. त्यानंतर गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना तत्काळ त्याची माहिती देण्यात येते. मदत करताना पोलिस ठाण्यांच्या हद्दीचा अडथळा येणार नाही, याची काळजी घेतली जाते.

अशी केली जाते मदत
आपत्कालिन परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीने ११२ क्रमाकांवर फोनकरून पोलिसांची मदत मागितल्यास नियंत्रण कक्षातून त्यास प्रथम प्रतिसाद दिला जातो. केंद्रातून संबंधित व्यक्तीचे ‘लोकेशन’ तपासून तो फोन तत्काळ संबंधित शहराच्या पोलिस नियंत्रण कक्षाला जोडला जातो. संबंधित नियंत्रण कक्षातून त्या व्यक्तीच्या जवळपास असणाऱ्या पोलिसांशी संपर्क साधून मदतीसाठी पाचारण करण्यास सांगण्यात येते. ही सर्व प्रक्रिया अत्यंत कमी कालावधीत पार पाडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. मदत मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तीकडून ‘फिडबॅक’देखील घेतला जातो.

पहा व्हिडिओ :