जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२५ । जळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नुकतीच यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात बिबट्याच्या हल्यात दोन वर्षीय चिमुकली ठार झालीय. अशातच चाळीसगाव तालुक्यामधील वरखेडे-दरेगाव रस्त्यावरील एका शेतात बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला करून त्याला ठार मारले. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

याबाबत असं की, वरखेडे येथील दरेगाव रस्त्यालगत असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतात जनावरांसाठी बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने गोठ्याची जाळी तोडून वासराला बाजूच्या शेतात ओढून नेले आणि त्याचा फडशा पाडला. हल्ला केल्यानंतर बिबट्याने डरकाळी देखील फोडल्याचे प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितले. ही घटना उघडकीस आल्यांनतर शेतकरी पाटील यांनी तातडीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. परिसरातील परिस्थिती आणि वासराला ओढून नेल्याच्या खुणांवरून परिसरात बिबट्याचा वावर असल्याची खात्री झाली आहे. बिबट्याने वासराचा फडशा पाडलेल्या ठिकाणी गुरांच्या चाऱ्याचा शिल्लक भाग दिसून आला.दरम्यान वरखेडे शिवारात एका शेतात पाण्याच्या हौदात बिबट्या आढळून आला होता. यानंतर आता गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला झाल्याने शेतकऱ्यांमध्ये अधिक भीती निर्माण झाली असून, बिबट्याला पकडण्यासाठी लवकरच पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.