महाराष्ट्रराजकारण

आज मंत्रिमंडळ विस्तार, शिंदे-भाजप गटाकडून कोणकोणते मंत्री शपथ घेणार?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२२ । महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन नवीन सरकार स्थापन केलं. या सरकारला स्थापन होऊन ४० दिवस उलटले तरी अद्यापही मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नव्हता. मात्र शिंदे-भाजप सरकारमधील मंत्रिमंडळ विस्ताराला आज मुहूर्त लागलाय.

आज सकाळी 11 वाजता राजभवनात भाजप आणि शिंदे गटातील प्रत्येकी 9 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. ज्या आमदारांना मंत्रिपद दिलं जाणार आहे, त्या आमदारांना कालच पक्षश्रेष्ठींकडून फोन गेले आणि त्यांना मुंबई गाठण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार रात्रीतून हे आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, शिंदे आणि भाजप गटाकडून कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता लागली आहे.

दरम्यान, अशातच भाजपकडून कुणाकुणाला फोन गेले किंवा कुणाची मंत्रिपदी वर्णी लागणार याची काही नावंही समोर आली आहेत. त्यात चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, सुरेश खाडे, विजय गावित, अतुल सावे, गणेश नाईक आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा समावेश आहे. या संभाव्य मंत्र्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलं होतं. त्यानुसार हे सर्वजण रात्री फडणवीसांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले आणि तिथे त्यांच्यात काही काळ चर्चाही झाली.

शिंदे गटाकडून कुणाला संधी?
तर शिंदे गटातील 9 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेतील. हाती आलेल्या माहितीनुसार आमदार गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, दादा भुसे, संजय शिरसाट आणि उदय सामंत यांना फोन गेले आहेत. त्यांना मुंबईत पोहोचण्याचे आदेश शिंदे यांनी दिले होते. त्यामुळे या आमदारांना मंत्रिपद मिळणार हे निश्चित मानलं जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button