⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

जळगावात राजकारणातील दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमने-सामने ; राजकीय वर्तुळात चर्चा

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२४ । जळगावात राजकारणातील दोन कट्टर प्रतिस्पर्धीच्या जुगलबंदीची बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आज जळगाव जिल्हा दौर्‍यावर असून आज सकाळी ते चाळीसगाव शहरातील एका खासगी हॉटेलमध्ये दाखल झाले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे हे आठवले यांच्या भेटला गेले. याच प्रसंगी चाळीसगावचे आमदार मंगेशदादा चव्हाण हे देखील तेथे पोहचले.

एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असणारे एकनाथ खडसे आणि मंगेश चव्हाण हे योगायोगाने आमने-सामने आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. एकनाथ खडसे आणि आमदार मंगेश चव्हाण हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही.दोन्ही नेते एकमेकांवर टीका करताना सर्व पातळी सोडून देतात.

दुध संघाच्या आखाड्यात या दोन्ही मान्यवरांमध्ये जोरदार कुस्ती रंगल्याचं पाहायला मिळाले. यात मंगेश चव्हाण यांनी थेट मुक्ताईनगरातून मंदाताई खडसे यांच्या विरूध्द अर्ज भरून त्यांना पराभूत केले. यानंतर चव्हाण यांच्याकडे दुध संघाची धुरा आल्यानंतर त्यांनी येथील गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल केला असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जोरदार तोंडसुख घेतलेले आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज आकस्मीक का होईना दोन्ही नेते रामदास आठवले यांच्या उपस्थितीत आमने-सामने आले. अर्थात, त्यांच्यात फारशी चर्चा झाली नाहीच. तथापि, या योगायोगाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.