जळगाव लाईव्ह न्यूज | 2 फेब्रुवारी 2024 | शेतकरी विविध संकटाचा सामना करून पीक घेतो. मात्र अनेकवेळा योग्य भाव मिळत नसल्याने पिकावर लागलेला खर्चही निघत नाही. याचप्रमाणे यंदाही कापसाला चांगला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. यंदा (२०२३) कापसाला चांगला भाव मिळेल, या आशेने बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली. मात्र, दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि गारपीटीच्या तडाख्यात हजारो हेक्टरवरील कापसाचे पीक उद्ध्वस्त झाले. उरल्या सुरल्या आशेवर बाजारभावाने पाणी फेरलं. सध्या कापसाला कवडीमोल भाव मिळत आहे.
जळगावसह बहुतांश जिल्ह्यांमध्ये कापसाला सध्या प्रतिक्विंटल ५ हजार ५०० ते ६ हजार ६०० रुपये इतका भाव मिळत आहे. त्यामुळे लागवडीसाठी लागलेला खर्चही निघेनासा झाला आहे. सरकारने कापसाला जास्तीत जास्त हमी भाव द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
कापसाला भाव नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांचा कापूस अजूनही घरातच पडून आहे. दरवर्षी दिवाळीनंतर कापसाचे भाव वाढतात. दोन वर्षांपूर्वी २०२१ मध्ये जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात कापसाला चांगला भाव मिळाला होता.
पांढऱ्या सोन्याला प्रतिक्विंटल १० ते ११ हजार रुपये बाजारभाव मिळाल्याने शेतकरी मालामाल झाले होते. मात्र मागील दोन वर्षांपासून कापसाला चांगला भाव नाहीय. अद्यापही कापसाचा भाव वाढेल, या आशेवर शेतकरी आहेत. मात्र, फेब्रुवारी महिना सुरू झाला तरी चांगल्या प्रतिचा कापूस भाव ६ हजार ते ६ हजार ६०० रुपयांवरच आहे.
त्यातच दिवसेंदिवस बाजारभाव कमी होत असल्याने आता किती दिवस कापूस सांभाळावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. काहीही झालं तरी पुढील वर्षी कापसाचं पीक घेणारच नाही, असा सूर शेतकऱ्यांमधून निघत आहे. मॉन्सूनोत्तर पाऊस आणि बोंडअळीमुळे कापसाचे उत्पन्न घटलं आहे. प्रतिएकर १० क्विंटलवर होणारे उत्पन्न ५ ते ६ क्विंटलवर येऊन ठेपलं आहे. यामुळे देशांतर्गत प्रक्रियेकामी चांगल्या कापसाची उपलब्धता कठीण वाटत आहे.