⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

तीन मिनिटात घरफोडी, विमानाने पलायन, देशभरात गुन्हे करणारा ‘जिम्मी’ एलसीबीच्या जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२२ । आजकाल चोर देखील हायटेक झाले असून चोरीचा मुद्देमाल सहज पचत असल्याने त्यांचे फावले होत आहे. जळगाव जिल्ह्यासह देशभरात गुन्हे करणाऱ्या नंदुरबारच्या ‘जिम्मी उर्फ दीपक विपीन शर्मा’ याच्या एलसीबीने मुसक्या आवळल्या आहे. दिवसा टेहळणी करीत अवघ्या तीन मिनिटात घरी डल्ला मारायचा, मुद्देमालासह मुंबई गाठायची आणि विमानाने देशभरात मोठमोठया शहरात पलायन करून तिथे घरफोड्या करायच्या असा त्याचा फंडा होता. जळगाव जिल्ह्यातील तीन घरफोड्यांची त्याने कबुली दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातील घरफोड्यांच्या तपासकामी एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पथक नेमले होते. पथकातील सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, संजय हिवरकर, राजेश मेंढे, संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, परेश महाजन व मुरलीधर बारी हे चोरट्याचा शोध घेत होते. चोपडा आणि अमळनेर तालुक्यातील घरफोड्या करण्याची पद्धत एकच असून त्या घरफोड्या नंदुरबार येथील जिम्मी शर्मा याने केल्याची माहिती निरीक्षक बकाले यांना मिळाली. पथक लागलीच त्याच्या शोधार्थ नंदुरबार येथे रवाना झाले.

पथकाने तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर जिम्मी शर्मा याची खात्री पटवली. जिम्मी हा गुंड प्रवृत्तीचा आन सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पथकाला मिळाली. शुक्रवारी नंदुरबार येथील घरून जिम्मी उर्फ दीपक विपीन शर्मा वय-२९ रा.गुरुकुल नगर याच्या मुसक्या आवळल्या. जिम्मी हा अट्टल गुन्हेगार असून ३ मिनिटात चोरी करायची, तेथून मुंबई गाठायची आणि तेथून विमानाने दिल्ली, हरियाणा, गुजरात, राजस्थान येथे जाऊन त्याठिकाणी गुन्हे करायचे असा त्याचा फंडा होता. जिम्मीविरुद्ध देशभरात ३० ते ४० गुन्हे दाखल आहेत.