⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

लाचप्रकरणी संशयितांना दोन दिवसांची सुनावली पोलिस कोठडी

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२१ । प्रवासी बस हस्तांतरणासाठी दहा हजाराची लाच घेतल्या प्रकरणी जळगाव आरटीओ कार्यालयातील एजंट शुभम राजेंद्र चव्हाण व राम भीमराव पाटील यांना बुधवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रकरणात आरटीओ विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आरटीओ कार्यालयातील शुभम चव्हाण याने लाच मागत असताना अनेक वेळा आरटीओ कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नावांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे चव्हाण याने यापूर्वी अशा प्रकारे किती कामे केली आहेत? आणखी कोण सहकारी आहेत याचा तपास घेण्यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती. युक्तीवादाअंती दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे ऍड. केतन ढाके यांनी काम पाहिले.