जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । जळगाव येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील शिपायास ३० हजारांची लाच घेताना जळगाव एसीबीच्या पथकाने कार्यालयातच रंगेहाथ पकडल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.
जळगाव जिल्ह्यातील एका तक्रारदाराने जळगाव सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात सिक्युरीटी गार्डच्या नोकरीसाठी अर्ज दिला होता. या कार्यालयातील चौधरी नामक शिपायाने आपले कार्यालयातील वरीष्ठांशी घनिष्ठ संबंध असल्याचे सांगून विश्वास संपादन करीत दोन लाख १० हजारांची मागणी केली होती व पहिल्या टप्प्यात सोमवारी ३० हजार रुपये देण्याचे सांगितल्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. जळगाव कार्यालयात एसीबीच्या पथकाने सापळा रचला. ३० हजारांची लाच शिपायाने स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली.
हा सापळा एसीबीचे नाशिक पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, वाचक पोलिस उपअधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत एस.पाटील, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव व पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, हवालदार शैला धनगर, नाईक मनोज जोशी, नाईक सुनील शिरसाठ, पोलिस नाईक जनार्धन चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने यशस्वी केला.