⁠ 
शनिवार, मे 4, 2024

धक्कादायक! जळगावचे तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट, ठगांनी मेसेज करून..

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२३ । ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले असून यात फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करून त्याआधारे अनेकांना गंडा घातल्याच्या घटनाही सातत्याने समोर येत आहेत. अशातच यात आता चक्क जळगावचे तत्कालिन जिल्हाधिकारी अमन मित्तल (Aman Mittal) यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून त्यावरून घरगुती साहित्य विक्री करावयाचे सांगून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकार?
काही दिवसापूर्वी राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यात जळगावचे तत्कालिन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची देखील बदली झाली. दरम्यान, अमन मित्तल यांचे बनावट फेसबुक तयार करण्यात येवून त्या माध्यमातून घरगुती साहित्य विक्री केले जात असल्याच्या या पोस्टबाबत अमन मित्तल यांच्या मित्रांनी त्यांना कळविले.

दरम्यान, सायबर चोरट्याने घरगुती सामान विक्री असल्याच्या पोस्ट सोबतच त्याचा पेटीएम क्रमांक सुध्दा टाकला होता. याच पेटीएम खात्यावर पैसे जमा करण्यासाठी स्वत: बँक अकाऊंट नंबरसह संपुर्ण माहिती आणि पेटीएमचा क्युआर कोड स्कॅन करण्यासाठी सुध्दा पाठविला होता. या संबंधित माहितीवरून बनावट फेसबुक खात तयार करण्याऱ्याचे नाव गोवर्धन लाल साहू असं असल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी तत्कालिन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी ऑनलाईन पध्दतीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तसेच प्रकारबाबत फोनवरून जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक एम राजकुमार यांना कळविले. तसेच संबंधित बनावट फेसबुक खातं व त्यावरून फसवणूक संदर्भातील मॅसेजचे फोटो अमन मित्तल यांनी पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांना व्हॉटसटॲपवरून पाठविले आहे.