लाच भोवली! महिला अधिकाऱ्यासह दोन लाईनमन जळगाव एसीबीच्या जाळ्यात
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२४ । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना वाढताना दिसत असून अशातच भुसावळ तालुक्यातील 34 हॉटेल व्यावसायिकांनी जुन्या वीज मीटरमध्ये फॉल्ट असल्याचे भासवून नवीन मीटर लावण्यासाठी सकारात्मक अहवाल मिळवण्याच्या बहाण्याखाली लाच मागणार्या तीन अधिकार्यांना जळगाव एसीबीने अटक केली आहे. वीज कंपनीतील लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सहाय्यक अभियंता कविता भरत सोनवणे, लाईनमन संतोष सुकदेव इंगळे आणि वरिष्ठ तंत्रज्ञ कुणाल अनिल चौधरी यांची नावे समोर आली आहेत.
हे तिन्ही अधिकारी सावदा विभागातील पाडळसा कक्ष कार्यालयात कार्यरत होते. हॉटेल व्यावसायिकांनी जुने मीटर काढून नवीन मीटर लावण्यासाठी सकारात्मक अहवाल मिळवण्याच्या मोबदल्यात आरोपींनी सुरुवातीला 20 हजार रुपये लाच मागितली होती, नंतर ती 15 हजार रुपयांवर आणली आणि शेवटी चार हजार रुपयांवर तडजोड झाली. लाच स्वीकारताना संतोष इंगळेला एसीबीने अटक केली आणि नंतर दोघा संशयित आरोपींनाही अटक करून फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, किशोर महाजन, राकेश दुसाने आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.