⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

Breaking : बीएचआर प्रकरणी जितेंद्र कंडारेला सुप्रीम कोर्टात जामीन मंजूर

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२३ । देशभर गाजलेल्या बीएचआर पतसंस्था अपहार प्रकरणी तत्कालीन अवसायक संशयित जितेंद्र गुलाबराव कंडारे याने दोन महिन्यांपूर्वी जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला असता न्यायालयाने ताे फेटाळला होता. दरम्यान, गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने शिक्रापूर येथील गुन्ह्यात कंडारे याला जामीन मंजूर केला आहे.

देशभरातील ७ राज्यांमध्ये २५० पेक्षा जादा शाखांचा विस्तार असलेल्या जळगावातील भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात ‘बीएचआर’ या नावाजलेल्या पतसंस्थेत संचालक मंडळाच्या नियमबाह्य आणि अनियमित व्यवहारांमुळे सुमारे ८०० काेटींचा अपहाराचा घाेटाळा उघडकीस आला आहे.

बीएचआर पतसंस्था अवसायनात काढण्यात आल्यानंतर नोव्हेंबर २०१५ मध्ये तत्कालीन सरकारने जितेंद्र कंडारे याची अवसायक म्हणून नियुक्ती केली होती. पतसंस्थेने वाटलेल्या कर्जाची वसुली करून ठेवीदारांच्या सुमारे ८०० कोटी रुपयांच्या ठेवी परत करायच्या होत्या. जप्त केलेल्या कर्जदारांच्या मालमत्ता लिलाव प्रक्रिया राबवून त्यातून येणाऱ्या सुमारे ९०० कोटी रुपयांच्या उत्पन्नातून पतसंस्थेला अवसायनातून बाहेर काढणे आवश्यक हाेते. परंतु, अवसायक कंडारे याने संशयितशी संगनमत करून मोठा गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

याप्रकरणी पुणे येथील शिक्रापूर पेालिस ठाण्यात व राज्यभरात ठिकठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. आर्थिक गुन्हा शाेध पथकाने सापळे रचून ठिकठिकाणाहून संशयितांना ताब्यात घेतले हाेते. यामध्ये प्रकाश जगन्नाथ वाणी, सुनील देवकीनंदन झंवर, रा. सुहास कॉलनी, जळगाव, महावीर माणिकचंद जैन, अजय नंदलाल राठी, आदिनाथ निवास कोटवळ टिळकवाडी, नाशिक व विवेक देविदास ठाकरे रा.महाबळ काॅलनी, जळगाव, अजय ललवाणी, उदय कांकरीया भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेचे ऑडिट करणारे धरम सांकला यांना टप्याटप्याने अटक केली हाेती. काही महिन्यांपूर्वीच काही संशयितांना न्यायालयाने जामीन मंजूर केले होते.

जितेंद्र गुलाबराव कंडारे यांच्याविरोधात व इतर आरोपीविरोधात पुरावा झाल्याने त्यांचेविरोधात २२ मार्च २०२२ रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी इंदौर येथून जितेंद्र कंडारे याला अटक केली होती. शिक्रापूर येथील गुन्ह्यात जामिनासाठी कंडारे याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर कामकाज झाले असता त्याला सर्वोच्च न्यायालयाचे न्या.अजय रस्तोगी व न्या.बेला त्रिवेदी यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला. कंडारे यांच्यातर्फे ऍड.रविंद्र अडसुरे यांनी बाजू मांडली.