जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२२ । जळगावातील एका महाविद्यालयात आलेल्या दोन अल्पवयीन बहिणी अचानक बेपत्ता झाल्याने मुलीच्या पालकांनी जिल्हापेठ पोलिसात हरवल्याची तक्रार केली होती. जिल्हापेठ पोलिसांनी आपली तपासचक्रे फिरवत या दोन्ही अल्पवयीन बहिणींचा शोध लावला. त्यांना पुण्यातून तीन तरुणांसह ताब्यात घेतल्याची माहिती आहे. जयेश देविदास सोनवणे (19), हितेश रामसिंग शिरसाठ (20), विवेक सुनील नन्नवरे (21, सर्व रा.बांभोरी) असे अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण?
दोन्ही बहिणी जळगावला काही कामानिमित्त आल्या असता त्या एसएनडीटी महाविद्यालयात गेल्या. तेथून त्या घरी परतल्या नाही. त्यामुळे पालकांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला धाव घेत तक्रार दिली होती.पोलिसांनी तीन दिवस अथक तपास करून त्यांचा माग काढला. यासाठी सीसीटीव्ही फुटेजची देखील मदत घेण्यात आली. तंत्रज्ञानाचा वापर करून मुलींचा शोध घेण्यात आला. अखेर दोन्ही मुली पुण्यामध्ये आढळल्या असून त्यांच्यासोबत तीन संशयीत तरुणांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, वैद्यकीय तपासणी करून यातील मोठ्या बहिणीला शासकीय आशादीप महिला वस्तीगृहात तर लहान बहिणीला बालसुधारगृहात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी संशयित तीन तरुणांना अटक केली असून तपास सहाय्यक निरीक्षक आर.डी.पवार करीत आहेत. दरम्यान, प्रेम प्रकरणातून ही घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.