शेतीसाठी पाणी हा सर्वात महत्वाचा घटक असून सिंचनासाठी जलसाठ्यांची आवश्यकता आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन ठिकठिकाणी बंधार्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त जमीन सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न करू असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथे बंधार्यांच्या भूमिपुजनप्रसंगी ते बोलत होते. जिल्ह्यासाठी जलसंधारण विभागाकडील जळगाव ग्रामीणसाठी १३ कोटींची कामे होणार आहेत. यातच बोरखेडा येथील खोलीकरणासह २ बंधार्यांचा समावेश असून या कामांना प्रारंभ करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथे मृदू व जलसंधारण खात्याच्या माध्यमातून १ कोटी १३ लक्ष रूपयांच्या २ बंधार्यांना मंजुरी मिळाली आहे. या बंधार्यांचा परिसरातील शेतीला लाभ होणार आहे. याच्या माध्यमातून परिसरातील विहरींची जलपातळी उंचावण्यात मदत होणार असून शेतकरी थेट यातून पाणी वापरू शकतील.
शनिवारी सायंकाळी या २ बंधार्यांच्या कामांचे भूमिपुजन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, पाणी हा शेतीचा आत्मा आहे. पाणी असेल तर शेतकर्याला पीके घेण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. परिसरातील बहुतांश भागांमध्ये आधीच पर्जन्यमान कमी असल्याने नैसर्गिक जलसाठ्यांना मर्यादा आहेत. यामुळे बंधार्यांच्या माध्यमातून परिसरातील भूमिगत जलसाठ्याची पातळी उंचाण्यासह सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपले प्राधान्य राहणार आहे.
ना. पाटील पुढे म्हणाले की, सध्या कोविडच्या आपत्तीमुळे विकासकामांसाठी मिळणार्या निधीला मर्यादा आल्या आहेत. असे असतांनाही बोरगाव येथे २ बंधारे मंजूर करण्यात आले असून हे दोन्ही बंधारे परिसराला वरदान ठरणार आहेत. आमच्या आजवरच्या वाटचालीचा केंद्रबिंदू हा शेतकरी असून याचमुळे शेतीशी संबंधीत जास्तीत जास्त कामांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे पालकमंत्र्यांनी याप्रसंगी नमूद केले. ते म्हणाले की, मार्च महिन्यात जिल्ह्यातील विकासकामांसाठी ६९ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला होता. यात जळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी भरीव अशा १३ कोटींच्या कामांची तरतूद करण्यात आली आहे. यातूनच बोरखेडा येथे २ बंधारे तयार करण्यात येत असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी पंचायत समिती सभापती मुकुंदराव नन्नवरे, रवि चव्हाण सर, सा.बा.चे उप अभियंता महेश ठाकूर, शाखा अभियंता सी.व्ही. महाजन, माजी सभापती भगवान पाटील, डी. ओ. पाटील, जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी, प्रेमराज पाटील, दामू अण्णा पाटील, विजय पाटील, मोती अप्पा पाटील, नवलराजे पाटील, ठेकेदार शर्मा, प्रशांत बिचवे, अनिल पंडित व गोपाळ चौधरी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी केले.