जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२१ ।
जळगाव शहरातील शिव कॉलनीमध्ये एका बंद असलेल्या घरात ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. घरातून प्रभाकर डिगंबर लांडे (वय ५६, रा. शिवकॉलनी) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गुरुवारी मृृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत असे की, लांडे यांची पत्नी डोंबिवली येथे राहणारा मुलगा राहुल यांच्याकडे गेलेली होती. त्यांचा दुसरा मुलगा पंकज हा दुबई येथे राहतो. शिव कॉलनीतील घरी लांडे हे एकटेच होते. त्यांनी ५ डिसेंबर रोजी सकाळी १०.४५ वाजता पत्नीशी मोबाइलवर संवाद साधला होता. त्यानंतरही त्यांनी फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, फोन लागला नाही. लांडे यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने बुधवारी शेजाऱ्यांनी रामानंदनगर पोलिसांना कळवले.
पोलिस निरीक्षक विजय शिंदे, पोलिस नाईक रेवानंद साळुंखे घटनास्थळी गेले. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यांना लांडे हे मृतावस्थेत आढळून आले. दोन-तीन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. पोलिसांनी त्यांच्याजवळ असलेला मोबाइल ताब्यात घेतला. मोबाइलवरून ५ डिसेंबर रोजी पत्नीशी संपर्क साधल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी लांडे यांच्या पत्नीच्या मोबाइलवर संपर्क साधून घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर पत्नी व मुलगा जळगाव येथे आले. लांडे यांच्या मृत्यूबाबत काही तक्रार नसल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गुरुवारी मृृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.