सरपंचाची बनावट सही करून ९ लाखांचा डल्ला; ग्रामसेवकाचा प्रताप.. माहिती अधिकारात फुटलं भ्रष्टाचाराचं बिंग

एप्रिल 11, 2026 2:18 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील जलचक्र-पळसखेडे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये शासकीय निधीचा मोठा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्रामसेवकाने चक्क सरपंचांची बनावट स्वाक्षरी करून सुमारे ९ लाख रुपयांचा निधी लाटल्याचा आरोप आहे. माहिती अधिकारांतर्गत (RTI) हा संपूर्ण घोटाळा उघडकीस आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

grampanchyat

नेमका कसा झाला गैरव्यवहार?

मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२२ मध्ये जलचक्र व पळसखेड या ग्रुप ग्रामपंचायतींतर्गत कामकाज सुरू असताना तत्कालीन सरपंच पंढरी शिराळे कार्यरत होते. त्याच काळात ग्रामसेवक गोविंद राठोड यांनी जलचक्र बुद्रुक, जलचक्र खुर्द व पळसखेड येथे शौचालय दुरुस्तीच्या नावाखाली निधी काढल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच एलईडी बल्ब खरेदीच्या नावाखालीही लाखो रुपये काढण्यात आल्याचे समोर आले आहे. या खर्चासाठी सादर केलेल्या बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली आहे. एका दुकानाच्या नावावर काम दाखवून दुसऱ्याच दुकानाची बिले जोडण्यात आली आहेत. प्रशासकीय मान्यतेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांवर सरपंचाची बनावट सही करण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे. हा संपूर्ण प्रकार माहिती अधिकारातून गोपीचंद सुरवाडे यांनी उघडकीस आणला. त्यांनी मिळविलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीत प्रमाणपत्रांवरील सरपंच आणि प्रमाणपत्रांवरील सरपंच आणि प्रशासक यांच्या स्वाक्षऱ्या खऱ्या नसल्याचे निदर्शनास आले आहे. प्राथमिक पाहणीत सुमारे ९ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत गटविकास अधिकारी आर. बी. सपकाळे यांनी केलेल्या अहवालात अनियमितता असल्याचे नमूद केले असून, संबंधित अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात आला आहे. या प्रकरणी ग्रामसेवकावर कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now