धरणगाव (प्रतिनिधी) : एका १६ वर्षीय शाळकरी मुलीवर अनेक वेळा बलात्कार केल्याबद्दल धरणगाव येथील मोहित चव्हाण याच्यावर ‘पॉक्सो’खाली गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे यांनी आरोपीला तिच्याशी लग्न करणार का? अशी विचारणा केली, त्यामुळे आज देशभरातील माध्यमांचे या सुनवाईकडे लक्ष वेधले गेले.
या प्रकरणातील आरोपी मोहित २४ वर्षांचा असून महाराष्ट्र विद्युत निर्मिती कंपनीत (महाजेनको) तंत्रज्ञ म्हणून नोकरीस आहे. लांबच्या नात्यात असलेल्या एका मुलीवर ती १६ वर्षांची असताना अनेक वेळा बलात्कार केल्याबद्दल मोहित याच्यावर ‘पॉक्सो’खाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या मुलीने घटनेच्या साधरण दोन वर्षांनंतर पोलिसांत फिर्याद नोंदविली होती. त्यावेळी आरोपीच्या आईने या मुलीला सज्ञान झाली की तिचे तुझ्याशी लग्न लावून देईन. तसेच तिला मी सून म्हणून स्वीकारेन, पण माझ्या मुलाविरुद्ध पोलिसांत तक्रार करू नका, असे ५०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर लिहून दिले होते. परंतु लग्न न झाल्यामुळे पीडिता कोर्टात पोहोचली.
याअगोदर ट्रायल कोर्टाकडून आरोपीला अटकेपासून संरक्षण देण्यात आले होते. पण उच्च न्यायालयाकडून मात्र ते फेटाळण्यात आले.