⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 14, 2024

रोटरी क्लब ऑफ जळगांव स्टार्सतर्फे फळ व किराणा साहित्याचे वाटप

0
rotary club of jalgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२१ । केशव स्मृती प्रतिष्ठान संचालित मातोश्री आनंदाश्रमात ४५ वृद्ध आजी आजोबा राहत आहेत. त्यासाठी प्रतिष्ठान तर्फे अनेक सोयी सुविधा देण्यात आलेल्या आहेत. खूप सुंदर असे नियोजन बद्ध कार्य प्रतिष्ठान तर्फे केले जाते. तेथे फुल न फुलाची पाकळी म्हणून आज मागील वर्षा प्रमाणे या वर्षीही क्लब तर्फे तेथे जेवणा साठी लागणारे किराणा साहित्याचे व फळांचे वाटप करण्यात आले व भविष्यात अजून ही काही मदत लागल्यास क्लब सदैव तत्पर राहील याची ग्वाही देण्यात आली.

त्यासाठी तेथील व्यवस्थापक श्री. संजय काळे सर यांनी रोटरी क्लब ऑफ जळगांव स्टार्सचे आभार मानले. तेथे धनराज कासट अध्यक्ष, सागर मुंदडा आय पी पी, सचिन बलदवा,चिराग शहा, सागर येवले व स्टाफ उपस्थित होते.

अमळनेर ग्रामिण रुग्णालयात स्वतंत्र ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी आमदारांच्या हालचाली सुरु

0
ncp mla anil patil

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२१ । अमळनेर येथील ग्रामिण रुग्णालयात स्वतंत्र ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी आमदार अनिल पाटील यांनी हालचाली सुरू केल्या असून डीपीडिसी च्या माध्यमातून 60 लाख रु खर्चातून हा प्रकल्प उभारण्यास जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी तत्वतः मंजूरी दिल्याने लवकरच हा प्रकल्प उभारला जाणार आहे.

यासंदर्भात आमदार पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ चव्हाण यांना पत्र देऊन प्रत्यक्ष चर्चा देखील केली आहे. त्यास हिरवा कंदील मिळाल्याने प्रकल्पासाठी योग्य जागा सुचवून तांत्रिक बाबी पूर्ण करण्याचे काम सुरू झाले आहे.

दरम्यान आमदार अनिल पाटील यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालय आणि इंदिरा भवनातील कोविड सेंटर व शहरातील सर्व खाजगी कोविड हॉस्पिटलला भेटी देऊन डॉक्टरांशी चर्चा केली यावेळी त्यांनी सामान्य व ऑक्सिजन बेडची उपलब्धता, ऑक्सिजन आणि रेमीडिसिव्हर इंजेक्शन चा पुरवठा, इतर आवश्यक बाबी, रुग्णालयातील स्टाफची स्थिती जाणून घेत रेमीडिसिव्हर आणि ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी तेथूनच जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांशी चर्चा करत मागणी देखील केली.

तसेच लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी अमळनेर तालुक्यात जास्तीत जास्त लसी उपलब्ध करण्याची मागणी आमदारांनी केली. यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी दोन दिवसांपूर्वी अमळनेर भेटीत अमळनेर स्थानिक प्रशासन कोरोना उपाययोजना राबविण्यात जळगाव जिल्ह्यात अव्वल असल्याचे सांगून कौतुक केले होते, या बाबीचे आमदार पाटील यांनी देखील कौतुक करून संपूर्ण प्रशासकीय टीमचे अभिनंदन केले.

सर्व रुग्णालयात रुग्णसंख्या घटल्याने व्यक्त केले समाधान-

यावेळी शहरातील सर्वच रुग्णालयाच्या भेटीत प्रत्येक ठिकाणी 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त बेडस खाली दिसून आल्याने आमदारांनी समाधान व्यक्त केली, यामुळे रेमीडिसिव्हर ची मागणी देखील कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, केवळ काही जण आजार अंगावर काढून उशिराने दाखल होत असल्याने रुग्ण गंभीर होत असल्याची माहिती अनेक डॉक्टरांनी दिली, त्यामुळे कुणालाही थोडा देखील प्रकृतीत बदल वाटत असल्यास त्यांनी डॉक्टरांना दाखवून त्यांच्या सल्ल्याने अँटीजन चाचणी करून घ्यावी आणि बाधित असल्यास तात्काळ विलगीकरन करून उपचार सुरू करावेत, आणि त्रास जास्त असल्यास तात्काळ रुग्णालयात दाखल व्हावे एवढी काळजी घेतल्यास कोणत्याही रुग्णास धोका होणार नाही अशी माहिती डॉक्टरांनी आमदारांना दिल्याने आमदारांनी देखील तमाम जनतेस डॉक्टरांच्या वरील सूचनेचे काळजीने पालन करावे आणि मास्क व सुरक्षित अंतराचे नियम काटेकोरपणे पाळावे असे आवाहन जाहीररीत्या केले.

अमळनेरात ऑक्सिजन प्लांट साठी पालकमंत्री व प्रशासनास आग्रह-

अमळनेर येथे गंभीर रुग्णांना तात्काळ ऑक्सिजन ची उपलब्धता होण्यासाठी अमळनेर येथे स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट चा आग्रह आमदारांचा असल्याने त्यांनी पालकमंत्री प्रशासनास पत्र दिले आहे, त्यात त्यांनी नमूद केले आहे की कोरोणाच्या लढाईत ऑक्सिजन हि सर्वात महत्वाची गरज आहे. रुग्णालयांचा ऑक्सिजन पुरवठा खंडीत होण्याच्या किंवा त्यामुळे कोरोणा रुग्णांचा मृत्यु होण्याच्या घटना काही ठिकाणी झाल्याचे वृत्त आहे, महाराष्ट्रासोबत आता इतरही अनेक राज्यातील कोरोणा रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अमळनेर येथे ग्रामिण रुग्णालय व इंदिरा गांधी भवन येथे एकुण 55 ऑक्सिजन युक्त खाटांच्या कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे ऑक्सिजन पुरवठ्याच्या बाबतीत अमळनेर येथिल ग्रामिण रुग्णालय आत्मनिर्भर होण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. भविष्यातील गरज लक्षात घेऊन अमळनेर येथे ऑक्सिजन पुरवठा करणारा शासकिय ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यसाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी अशी  विनंती आमदार पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली आहे.

व्याजाने घेतलेले पैसे परत न देण्यासाठी केला दाम्पत्याचा खून

0
kusumba murder case news

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२१ । जळगाव येथून जवळच असलेल्या कुसुंबा येथे दाम्पत्याचा गळा आवळून खून करण्यात आला होता. जळगाव पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने दोन दिवस रात्रंदिवस परिश्रम घेत गुन्ह्याचा छडा लावला आहे. मयत आशाबाई यांच्याकडून व्याजाने घेतलेले पैसे परत न देण्यासाठीच खून करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिली आहे. 

पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, एमआयडीसीचे निरीक्षक प्रताप शिकारे यांनी गुन्हयांतील आरोपी निष्पन्न करण्यासाठी समातंर तपास करणे कामी स्थानिक गुन्हे शाखेचे ७ ते ८ वेगवेगळे पथके तयार करुन प्रत्येक पथकाला वेगवेगळे कामे सोपविण्यात आलेली होती. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथके घटनास्थळाचा परिसरात गोपनिय माहिती परिसरांतील सीसीटीव्ही फुटेज, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी, तांत्रिक माहिती गोळा करून त्यांचे बारकाईने अवलोकन करण्यात आले होते. मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन पथकाने संशयीत आरोपीतांची सखोल माहिती घेतली. मयतांची पार्श्वभूमी गोपनिय माहिती घेतली. संशयीत आरोपीतांचा गुन्हयांचा उद्देश काय होता याबाबत माहिती घेतली. सर्व माहिती मिळाल्यानंतर संशयीत आरोपींची माहिती त्यांचा व्यवसाय, त्यांची आर्थिक परिस्थिती, त्यांचे मयताशी असलेले संबंध या सारासार गोष्टींचा विचार करुन अनेकांची दोन दिवस झाडाझडती घेतली.

तिघांवर बळकावला संशय

पथकाने केलेल्या चौकशीत काही नावे समोर  आल्याने देविदास नामदेव श्रीनाथ वय-४० गुरुदत्त कॉलनी, कुसूबा, अरुणाबाई गजानन वारंगणे वय-३० रा.कुसुंबा व सुधाकर रामलाल पाटील वय-४५ रा.चिंचखेडा ता.जामनेर यास चिंचखेडा येथील राहते घरी वेगवेगळे पथके पाठवून त्यांना एकाच वेळी चौकशी कामी ताब्यात घेतले. त्यांना गुन्हयांबाबत सखोल विचारपुस करीत असतांना त्यांनी गुन्हयांची कबुली दिली.

एकीने घेतले होते पैसे, दोघांना होती गरज

पथकाने केलेल्या चौकशीत तिघांनी गुन्हा कबूल केला आहे. संशयीत अरुणाबाई हीने मयत आशाबाई हिचेकडून व्याजाने पैसे घेतले होते. सुधाकर पाटील हा सुध्दा आर्थिक अडचणीत होता. मयतहिचे कडेस मोठया प्रमाणात रोख रक्कम व सोन्याचे दागिने असून मयत हिला मारण्याचा व तिचे कडील रोखं रक्कम सोन्याचे दागिने लुटण्याचा प्रथम कट रचला.

पतीचा गच्चीवर तर तर पत्नीचा घरातच आवळला गळा

सुधाकर पाटील यांनी गळफास देण्यासाठी दोरी व कटर घेऊन ते देविदास व अरुणाबाई यांचेकडेस देवून तो प्रथम मयताचे घरी गेले. त्यानंतर थोडयावेळाने सुधाकर पाटील हा मयताचे घरी गेला. त्यानंतर देविदास व सुधाकर पाटील अशांनी प्रथम मयत मुरलीधर पाटील यास त्यांचे घराचे गच्चीवर गळफास देवून मारुन टाकले. तेव्हा अरुणाबाई हिने मयत आशाबाई पाटीलला घरात गप्पा गोष्टीत व्यस्त ठेवले. देविदास गच्चीवरुन आल्यावर मयत आशाबाई मुरलीधर पाटील ही खुर्ची बसलेली होती. अरुणाबाई तिच्याजवळ खाली बसलेली होती. देविदासने मागून येत तिच्या गळयाला दोरीने गळफास दिला. यावेळी सुधाकर पाटील याने मयताचे पाय धरुन ठेवले होते व अरुणाबाई वारंगणे हिने उशीने तोंड दाबून तिला सुध्दा जिवे ठार मारले. त्यांना मारल्यानंतर तिघे आरोपीतांनी मयताचे अंगावरील सोन्याचे दागिने व तिचे घरातील रोख रुपये चोरी केले. त्यानंतर सुधाकर पाटील हा त्याचे मोटार सायकलवर, देविदास श्रीनाथ व अरुणाबाई वारंगणे दोघे देविदास याचे मोटार सायकलवर बसुन चिंचखेडा येथे निघून गेले होते.

महापौरांच्या विनंतीला यश, मनपात युपीआयद्वारे करता येणार भरणा

0
mayor jalgaon news

 

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२१ । जळगाव शहर मनपात वेगवेगळ्या करांचा भरणा करण्यासाठी ऑनलाईन युपीआय सेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. नागरिकांच्या सोयीसाठी आणि मनपाच्या हितासाठी युपीआय सेवा उपलब्ध करून द्यावी असे पत्र महापौर जयश्री महाजन यांनी आयसीआयसीआय बँकेला दिले होते. महापौरांच्या पत्राची दखल घेत रविवारी दिवसभर काम करून सोमवारपासून युपीआयची सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे.

 

सद्यस्थिती कोविडचा प्रादुर्भाव वाढला असून दररोज रुग्ण संख्या देखील वाढत आहे. देशात सर्वत्र लॉकडाऊन सुरु असल्यामुळे जळगांव शहर महानगरपालिकेसह अनेक शासकिय कार्यालयात नागरीकांना येणे-जाणेस प्रतिबंध करण्यात आलेला आहे. परिणामी वसुली अभावी जळगांव शहर महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होत आहे.

याकरीता जळगांव शहर महानगरपालिकेने देखिल इतर शासकिय कार्यालयांप्रमाणे युपीआयच्या धर्तीवर गुगल पे/पे फोन यांच्या माध्यमातून कराची रक्कम स्विकारणे गरजेचे झालेले होते तसेच अश्या अदायगीव्दारे नागरीकांना देखिल कमिशन, टॅक्स याचा अतिरिक्त भुर्दंड होत नाही. त्यामुळे या सेवा कार्यान्वीत करणे बाबत सतत मागणी होत होती. त्यामुळे जळगाव शहर मनपाची युपीआय सेवा सुरू करावी, असे पत्र महापौर जयश्री महाजन यांनी दिले होते.

 

सद्यस्थिती मागील आठवड्यात सर्व बँकासह इतर आस्थापनांना बऱ्याचश्या शासकिय सुट्या होत्या. अश्या प्रसंगी युपीआय सेवा जळगांव शहर महानगरपालिकेत कार्यान्वीत करणे शक्य नव्हते. महापौरांच्या पत्राची दखल घेत सुट्टी असतानाही आय.सी.आय.सी.आय. बँकेतील अधिकारी, कर्मचारी रिलेशशिप ऑफिस विशाल रामराव सरप, शाखा व्यवस्थापक रविंद्र जोशी, विभागीय अधिकारी देवेंद्र जंजाळे यांनी शनिवार, रविवार या सुटीच्या दिवशी संपूर्ण कार्यवाही पुर्ण करुन सोमवारी कार्यालयीन वेळेत सुमारे सकाळी ११ वाजेला जळगाव शहराच्या सेवेत युपीआयाव्दारे मालमत्ता कराचा भरणा करण्याची प्रक्रिया सुरु करुन दिली.

नागरिकांच्या सोयीसाठी सुट्टीचे दिवस असताना देखील पुढाकार घेत युपीआय सेवा उपलब्ध करून दिल्याने महापौरांनी बँकेचे आभार मानले आहे.

रुग्णालयात आगीचा डेमो, जळगाव मनपा अग्निशमन विभाग सतर्क

0
jalgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२१ । राज्यातील आरोग्य प्रशासन कोविडशी झुंजत असताना दुसरीकडं रुग्णालयांतील अपघातांच्या घटना घडत आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या आगीच्या दुर्घटना बघता आज जळगाव शहरातील सर्व कोविड रुग्णालय यांची तपासणी करण्यात आली.

 

यावेळी प्राथमिक स्वरूपाच्या आग नियंत्रणाची माहिती व प्रात्यक्षिक करून दाखवितांना अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी सहा.अग्निशमन अधिकारी सुनिल मोरे फायरमन अश्वजित घरडे, तेजस जोशी , नितीन बारी यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले.

 

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी कोविड रुग्णालयांना लागलेल्या आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील सर्व कोविड रुग्णालयात  आगीच्या घटना घडू नये म्हणून मनपा अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणाची माहिती व प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आली. शहराती विविध कोविड रुग्णालयात जाऊन त्यांनी आगीबाबचा डेमो करून दाखवला.

कोरोना लसीकरण जनजागृतीसाठी मुकुंद गोसावी यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती

0
vaccination on corona is effective

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोना लसीकरण कार्याला अधिक गती यावी सोबतच ग्रामीण भागातील नागरिकांना तसेच दिव्यांग, ज्येष्ठ व शासनाच्या निर्देशानुसार ज्यांना लसीकरणात समाविष्ट केले आहे. त्या साऱ्यांना लसीकरण कार्याची प्रभावी माहिती देऊन शंभर टक्के लसीकरणाची अंमलबजावणी व्हावी. याकरिता कोरोना लसीकरण कार्याचे ब्रॅण्ड ॲम्बेसेडर (स्टार प्रचारक) म्हणून मुकुंद गोसावी यांची जिल्हा शल्यचिकित्सक तथा नोडल अधिकारी कोविड-19 डॉ. एन. एस. चव्हाण यांनी नियुक्ती केल्याचे प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

मुक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी हे सामाजिक व आरोग्य विषयक कार्यात नेहमी स्वयंस्फूर्तीने निरपेक्षपणे सहभागी होतात. रक्तदान, अवयवदान, नेत्रदान, देहदान, व्यसनमुक्ती, तंबाखुमुक्ती, कॅन्सर, कृष्ठरोग, क्षयरोग, एडस निर्मूलन, पल्स पोलीओ, मानसिक आरोग्य तसेच विविध आरोग्य शिबीरांमध्ये आरोग्य यंत्रणेला सहकार्य नेहमी सहकार्य करीत असतात.

श्री. गोसावी यांनी कोरोनाच्या कठीण काळातही शारीरीक व्यंगाला न जुमानता कोरोना जनजागृती पत्रक वाटप, मास्क, सॅनेटाईझर वाटप, पॉझिटीव्ह रुग्णांची भीती कमी करणे, त्यांचे समुपदेशन करणे, रुग्णांना वैद्यकीय सेवेचे सहकार्य आदि कार्यही तन्मयतेने करतात. असेही डॉ. चव्हाण यांनी नियुक्तीपत्रात म्हटले आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : घरगुती सोयाबीन बियाणे राखून ठेवण्याचे कृषि विभागाचे आवाहन

0
farmers should keep homemade soybean seeds

 

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२१ । सोयाबीन बियाण्यांचा भाव वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी घरगुती सोयाबिन बियाणे पेरणीसाठी वापरावे, त्यासाठी घरचे सोयाबीन बियाणे राखुन ठेवावे. असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

सध्या बाजारात सोयाबीनचा भाव वधारला असल्याने बियाणे कंपन्याही सोयाबीन बियाण्याचे दर मागील वर्षापेक्षा जास्त दराने आकारण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेले सोयाबीन बाजारात न विकता येत्या खरीप हंगामासाठी राखुन ठेवावे. स्वत:ची गरज भागवून शिल्लक असलेले बियाणे आपल्या गावातील इतर शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिल्यास, देणारा व घेणारा दोन्ही शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होईल.

सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पीक असल्याने पेरण्यात येणारे बियाणे सरळ वाणाचे आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. मागील वर्षात पेरणी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित होणारे सोयाबीन हे बियाणे म्हणून शेतकऱ्यांनी वापरल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो.

सोयाबीन बियाणे हे अधिक संवेदनशील आहे. साठवणुक व हाताळणी दरम्यान तापमान आणि हवेतील आद्रतेचा बियाण्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम होतो. सोयाबिन बियाणे साठवणुक करतांना पोत्यांची थप्पी 7 फुटा पेक्षा जास्त नसावी याची दक्षता घ्यावी. उगवणक्षमतेची चाचणी पेरणीच्या एक अथवा दोन आठवड्यापूर्वी करावी. सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता चांगली म्हणजे 70 टक्के पेक्षा जास्त असले तर शिफारस केल्याप्रमाणे पेरणीसाठी हेक्टरी 75 किलो बियाणे वापरावे. उगवणक्षमता 60 टक्के असल्यास हेक्टरी 80 किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे. तसेच हलक्या व कमी पाणी उपलब्ध असलेल्या जमिनीत सोयाबिनच्या तीन ओळी व तुरीची एक ओळ याप्रमाणे आंतरपीक घेऊन पेरणी केल्यास उत्पन्नात वाढ होईल.

याबाबत शेतकरी बांधवाना काही समस्या असल्यास कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. असे संभाजी ठाकुर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

फैजपूरात लसीकरणाची सुविधा उपलब्ध करा

0
vaccination

 

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२१ । जवळपास ४० हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या फैजपूर शहरात लवकरात लवकर लसिकरणाची सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष व भाजपा नेते निलेश राणे यांनी खा.रक्षा खडसे यांच्याकडे केली आहे.

शहरातील लोकांना ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या न्हावी येथील ग्रामीण रुग्णालयात लसिकरणासाठी जावे लागत असल्याने अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात.फैजपूर शहरात लसिकरणाची सुविधा उपलब्ध झाली तर लोकांना होणारा त्रासही वाचेल व पैसा,वेळही वाचणार आहे म्हणून फैजपूर शहरात लसिकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी निलेश राणे यांनी खा.रक्षा खडसेंकडे केली आहे

जळगाव शहरातील दुचाकी चोरीचे सत्र थांबता थांबेना

0
crime

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२१ । जळगाव शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून ते थांबण्याचे नाव घेत नाहीय. शहरात रोज दुचाकी चोरीच्या घटना घडत असून यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, शहरातील पोलन पेठ परिसरातून २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

याबाबत असे की, मयूर अर्जून कोळी (वय-१७ रा. ममुराबाद) या तरुणाची दुचाकी पोलन पेठमधून चोरीला गेली आहे. मयूर कोळी हा पोलन पेठ मधील अग्रवाल फॅन्सी फटाक्याच्या दुकानावर कामाला आहे. कामावर ये-जा करण्यासाठी (एमएच १९ बीडब्ल्यू ६४२) क्रमांकाची दुचाकी आहे. ही दुचाकी त्यांनी भास्कर मार्केटमधील चौधरी ॲटो कन्सलटींग येथून विकत घेतली आहे. २४ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास मयूर कोळी अग्रवाल दुकानावर कामाचे पैसे घेण्यासाठी आला होता.

त्याने दुचाकी दुकानाच्या समोर पार्किंग करून लावली होती. दुकान मालक अनिल अग्रवाल सोबत मयूर गावातील फिरस्तीवर गेला. काम आटोपून सायंकाळी ६ वाजता मालकासह मयूर दुकानावर आले. घरी जाण्यासाठी दुचाकीजवळ मयूर आला असता त्याला त्याची दुचाकी पार्किंगला लावलेली दिसून आली नाही. पोलन पेठ परिसरात दुचाकीचा शोध घेवून मिळून न आल्याने मयूरने शहर पोलीस ठाणे गाठले. मयूर कोळी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर निकुंभ करीत आहे.