⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2024

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

0
jalgaon news

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ मे २०२१ । महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

याप्रसंगी महापौर श्रीमती जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त सतीष कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसिलदार सुरेश थोरात, सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पोलीस दलाच्या पथकाने मानवंदना दिली. तर पोलीस बॅन्ड पथकाने राष्ट्रगीताची धुन वाजविली.

लसीकरणासाठी तरूणांनी घाई न करण्याचे आवाहन

राज्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लस देण्यासाठी राज्य शासन कटीबध्द आहेत. लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरण आजपासून सुरू होणार असल्याने नागरिकांनी आपली नोंदणी कोविन ॲपवर करावी. ज्यांची नोंदणी होईल त्यांनीच लसीकरण केंद्रावर उपस्थित राहून लस घ्यावी. इतरांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये. 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू असून त्यांनी केंद्रावर जाऊन लस घ्यावी. असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्हावासियांना केले.

जिल्हा प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजना व नागरिकांच्या सहकार्याने जिल्हा लवकरच कोरोनावर मात करेल असा विश्वासही त्यांनी कार्यक्रमानंतर बोलतांना व्यक्त केला.

पाचोऱ्यात लसीकरणाला सुरुवात ; पण साठा मोजकाच

0
pachora

 

जळगाव लाईव्ह न्यूज ।  ०१ मे २०२१ । आज 1 मे महाराष्ट्र दिनापासून 18 वर्षावरील सर्व मागरिकांनचे संपूर्ण महाराष्ट्रसह पाचोऱ्यात लसीकरण सुरु करण्यात आले. पण लसीचा पुरेसासाठा नसल्या कारणाने आज 1 मे रोजी फक्त लसीकरणाचा ‘दुसरा डोस’उपलब्ध आहे. 

 

तोही कमी प्रमाणात मोजक्याच नागरिकांचेच आज लसीकरण होऊ शकेल. 3 मे पासून जर लसी उपलब्ध झाल्या तर सर्व 18 वर्षावरील नागरिकांनचे लसीकरण होईल, अशी माहिती पाचोरा ग्रामीण रुग्णलंय प्रशासनाने जळगाव लाईव्ह पाचोरा तालुका प्रतिनिधीला दिली.

 

गिरीश महाजन यांना सोशल डिस्टंसिंगवरून महिलेने सुनावले खडे बोल; व्हिडीओ व्हायरल

0
girish mahajan and social distancing

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२१ । नाशिक येथील बिटको रूग्णालयात देवेंद्र फडणीस, प्रवीण दरेकर आणि गिरीश महाजन यांना नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. याबद्दलचे २ व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, नाशिक येथील बिटको रूग्णालयात देवेंद्र फडणीस, प्रवीण दरेकर आणि गिरीश महाजन हे पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती.

आधीच नाशिकमध्ये कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असतांना अशा प्रकारची गर्दी करणे कितपत योग्य आहे? असा सवाल काही नागरिकांनी थेट गिरीश महाजन यांना यावेळी विचारला. सोशल डिस्टन्स आम्हाला धडे देता स्वतः मात्र पाळत नसल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला.

नेत्यांना कार्यकर्त्यांसह रुग्णालयात प्रवेश मिळतो मात्र, सर्वसामान्यांना प्रवेश मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन व नातेवाईकांमध्ये चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.

18 ते 45 वयोगटातील नागरिकांनी लसीकरणासाठी संयम बाळगावा

0
vaccination

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ मे २०२१ । महाराष्ट्र शासनाच्या सूचनांनुसार 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण मर्यादित व प्रातिनिधिक स्वरूपात आज (1 मे) पासून सुरू होणार आहे. मात्र यासाठी Cowin app वर पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे.

ही नोंदणी केल्यावर ज्यांना वेळ व लसीकरण केंद्राचा मेसेज येईल त्यांनाच लसीकरण उपलब्ध होणार आहे. 18 ते 45 वयोगटासाठी लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा नाही, त्यामुळे या वयोगटातील नागरिकांनी केंद्रावर गर्दी करू नये. असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी केले आहे.

45 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांचे लसीकरण शासकीय केंद्रावर नियमितपणे सुरू राहील. असेही डाॅ.चव्हाण यांनी कळविले आहे.

सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण; जाणून घ्या जळगावमधील आजचे दर

0
gold

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ मे २०२१ । गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या सोने चांदीच्या भावात आज शनिवारी मोठी घसरण झाली आहे. सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम ५२० रुपयांनी स्वस्त झालंय, तर चांदीत प्रतिकिलो ११०० रुपयांनी घसरण झालीय.

सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ५२ रुपयांनी कमी होऊन  ४,७१८ रुपये झाला आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४७,१८० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,४९३ रुपये इतका आहे. त्यात ५० रुपयांची घसरण झाली असून १० ग्रामसाठी तुम्हाला ४४,९३० रुपये मोजावे लागतील.

चांदीचा भाव 

आज चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. आज (०१ मे) चांदी दर ११०० रुपयांनी कमी झाला आहे.  १ ग्राम चांदीचा भाव आज ७२. ०८ रुपये इतका असून १ किलोचा दर ७२,८०० रुपये इतका आहे.

दरम्यान, कोरोनामुळे जगभर अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे शेअर बाजारांत घसरण होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार तेथून गुंतवणूक काढून सोनेखरेदीवर भर देत आहेत. त्यामुळे सोन्याचा भाव वाढण्याची शक्यता आहे.

सावखेडा ब्रू ग्रामपंचायतीत अपहार झाल्याची तक्रार

0
mangesh paanpatil

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२१ । जळगाव तालुक्यातील सावखेडा ब्रू ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणावर अपहार झाला असून 2015 ते 20 या सालात शासनाकडून आलेल्या निधीत संबंधित तत्कालीन सदस्यांनी गावात विकास कामे झाल्याचा कागदोपत्री बनाव केला आहे. प्रत्यक्षात जागेवर जाऊन तपासणी केली असता निकृष्ट दर्जाचे रस्ते तसेच स्वच्छता गृहे, घरकुल बांधण्यात आले आहे. तसेच 14 व्या वित्त आयोगात निधीची देखील अफरातफर झाल्याचे गावाच्या झालेल्या आजच्या अवस्थेवरून लक्षात येते, असे ग्रामपंचायत सदस्य मंगेश यशवंत पानपाटील यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्याकडे तक्रार केली आहे.

निवेदनात पुढे त्यांनी म्हटले आहे की, तत्कालीन सदस्यांनी निधीचा  सदुउपयोग गावाच्या विकासासाठी प्रामाणिक पणे केला असता तर गावातील विकासाला चालना मिळाली असती. मात्र सदर ठिकाणी अधिकाराचा दुर उपयोग झालेला दिसून येत आहे.

ई- ग्रामस्वराज या शासनाच्या गुगल ऍप्स वर कामे तपासली असता गरज नसताना निधीचा दुरुपयोग केल्याचे समजते आहे. गावात विकासासाठी ज्या ठिकाणी निधी वापरला गेला पाहिजे नेमकं निधी खर्च करताना मोठे राजकारण तसेच अपहार झाल्याचे आढळते रमाई घरकुल योजना तसेच शबरी घरकुल योजना यामध्ये शासनाकडून आलेल्या निधी चा देखील दुरुपयोग झालेला आहे प्रत्यक्षात घरकुलांची अवस्था अतिशय खालावलेल्या व निकृष्ट दर्जाची आहे मात्र सत्य पुढे शहाणपण कोण करणार ? म्हणून तत्कालीन सदस्यांच्या दबावामुळे कोणीही अद्याप पर्यंत तक्रार केलेली नाही, तत्कालीन सदस्यांनी परस्पर हितजोपासून गोरगरीब जनतेला लुटले आहे कृपया करून या सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्यात यावी तसेच दोषी असणाऱ्या प्रत्येक तत्कालीन सदस्यांवर शासकीय कलम कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

जळगाव जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बरे होणारे रुग्ण अधिक

0
corona update

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आलेख गेल्या काही दिवसांपासून स्थिर येत आहे. जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचा आकडा अधिक आहे. आज दिवसभरात एक हजार ०७ रुग्ण आढळले आहे. तर आजच १ हजार ३० रुग्णांनी कोरोनावर मात केली. गेल्या २४ तासांत २१ जणांचा बळी गेला.

जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाची तिव्रता मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र तीन आठवड्यांपासून काहीअंशी कोरोना रुग्ण संख्या कमी होत असतांना दिसत आहे. तसेच बरे होणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. शुक्रवारी आज तब्बल ८ हजार ९९९ चाचन्याचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील १ हजार ०७ नवे बाधित आढळून आले, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १ लाख २२ हजार ००४ वर पोचली.

तर आज १ हजार ३० रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख ९ हजार १५९ वर गेला आहे. तर २१ जणांच्या मृत्यूने बळींची संख्या २ हजार १८४ वर पोचली आहे. दरम्यान, जिल्ह्यात सध्या १० हजार ६६१ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

जळगाव शहरात १४१, जळगाव ग्रामीण २०, भुसावळ १०१, अमळनेर ४७, चोपडा ३२, पाचोरा १४८, भडगाव ८,  धरणगाव १२, यावल ३१, एरंडोल ५८, जामनेर ११२, रावेर ४७, पारोळा १७, चाळीसगाव ५८, मुक्ताईनगर १११, बोदवड ६१, अन्य जिल्ह्यातील ३ असे एकूण १००७ रुग्ण आढळून आले आहे.

आता टॉसिलीझुमाब इंजेक्शनचे वाटप होणार जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली

0
tosilizumab injections (1)

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२१ । आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील दिनांक 28 एप्रिल, 2021 रोजीच्या आदेशान्वये टॉसिलीझुमाब (Tocilizumab) हे इंजेक्शन जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली संबंधित शासकीय/खाजगी रुग्णालयास वाटप करण्याबाबतचे निर्देश मे. सिप्ला लि या कंपलीन निर्गमित करण्यात आलेले आहेत.

आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील दिनांक 28 एप्रिल, 2021 रोजीच्या आदेशानुसार निर्गमित करण्यात आलेल्या सुचनांचे जळगाव जिल्ह्यातील सर्व मेडीकल डिलर्स, सर्व घाऊक मेडीकल विक्रेते यांना पालन करणे बंधनकारक राहील. तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व मेडीकल डिलर्स, सर्व घाऊक मेडीकल विक्रेते टॉसिलीझुमाब (Tocilizumab)  या इंजेक्शनचा साठा प्राप्त झाल्यास त्यांनी  त्याबाबतची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव व औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन कार्यालय, जळगाव यांना द्यावी.

जळगाव जिल्ह्यातील सर्व मेडीकल डिलर्स, सर्व घाऊक मेडीकल विक्रेते यांना जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या लेखी परवानगीशिवाय टॉसिलीझुमाब (Tocilizumab) या इंजेक्शनचे वितरण किरकोळ मेडीकल विक्रेते यांना करता येणार नाही.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

कोरोनाच्या प्रतिकारासाठी ऑक्सीजन निर्मितीत स्वयंपूर्ण होणार ; पालकमंत्री ना. पाटील यांची ग्वाही

0
gulabrao patil

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२१ । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता अजून ओसरलेली नसतांना आता तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा देखील दिलेला आहे. कोविडचा संसर्ग समोर आल्यापासूनच जिल्हा प्रशासनाने अचूक नियोजन करून याचा यशस्वी प्रतिकार केला आहे. याच प्रमाणे या विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा प्रतिकार करण्यासाठी ऑक्सीजन निर्मितीत स्वयंपूर्ण बनण्याचे उद्दीष्ट आम्ही घेतले असून यासाठी आतापासूनच सुक्ष्म नियोजन करण्यात येत असल्याची ग्वाही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. महाराष्ट्र दिनानिमित्त दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

प्रश्न : सध्या कोविडचा हाहाकार सुरू असून याच्या उपाययोजनांसाठी आपण नेमके काय प्रयत्न करत आहात ?

ना. गुलाबराव पाटील – कोविडच्या दुसर्‍या लाटेचा प्रकोप सध्या दिसून येत असला तरी पहिल्या लाटेप्रमाणेच आपण ही लाटही थोपवून धरणार यात शंकाच नाही. साधारणपणे १५ फेब्रुवारी पासून दुसर्‍या लाटेचा संसर्ग दिसून येत असला तरी अलीकडे रूग्णसंख्या स्थिरावल्याचे दिसून येत आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य लाभल्याची बाब मला आवर्जून येथे नमूद करावीशी वाटत आहेत. कोविडच्या प्रतिकारासाठी अनेक घटकांच्या मदतीने यंत्रणा उभारण्यात आली असून यामुळे आपण हे युध्द जिंकणार आहोत.

प्रश्न ​: ऑक्सीजनच्या पुरेशा साठ्यासाठी जिल्हा प्रशासन नेमकी काय उपाययोजना करत आहे 

ना. गुलाबराव पाटील – ऑक्सीजनची उपलब्धता हा कोविड विरूध्दच्या युध्दातील सर्वात निर्णायक घटक आहे. पुरेसा ऑक्सीजन उपलब्ध असेल तर अगदी गंभीर असणार्‍या रूग्णाला देखील वाचविता येते. सध्या जिल्ह्यातील रूग्णांसाठी दिवसाला सरासरी ५५ ते ६० मेट्रीक टन इतक्या ऑक्सीजनची आवश्यकता असतांना आपल्याला  ४१.८१ मेट्रीक टन इतका प्राणवायू मिळत आहे. जिल्ह्यात आज रोजी सुमारे १०,७६६ कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील १६०४ रूग्णांना ऑक्सीजन लावण्यात आलेला आहे, ८७२ पेशंट हे आयसीयूमध्ये तर २१७ व्हेंटीलेटरवर आहेत. यामुळे पुरेसा प्राणवायू हा आमचा आजचा पहिला प्राधान्यक्रम आहे.

प्रश्न ​: …मग पुरेसा ऑक्सीजन निर्मित व्हावा यासाठी आपण नेमके काय करणार आहात 

ना. गुलाबराव पाटील – सध्या नियोजन करून आम्ही ऑक्सीजनचा तुटवडा भरून काढत आहोत. मात्र याबाबत स्वयंपूर्ण होण्याचा संकल्प आम्ही घेतला आहे. यासाठी जिल्ह्यात १० ठिकाणी ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारण्याला मंजुरी मिळालेली आहे. यात भुसावळ, चाळीसगाव, अमळनेर, पारोळा, रावेर, भडगाव व धरणगाव येथील ग्रामीण रूग्णालये; मोहाडी येथील महिला रूग्णालय आणि चोपडा मुक्ताईनगर आणि जामनेर येथील उपजिल्हा रूग्णालयांमध्ये एकूण १० ठिकाणी ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यासाठी ८ कोटी, ०२ लक्ष रूपयांच्या निधीला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. या सर्व प्रकल्पांमधून  तब्बल ३७०० एलपीएम  क्षमते इतका प्राणवायू निर्मित होणार आहे. आपल्या सद्यस्थितीतील गरजेपेक्षा हा  जास्त आहे. मात्र कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता गृहीत धरून आम्ही नियोजन करत आहोत. यामुळे कोणत्याही आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी आपण सज्ज होणार आहोत. 

प्रश्न ​: सध्या रूग्णांना उपलब्ध असणार‍या बेडबाबत प्रशासनाने काय उपाययोजना केल्या आहेत 

ना. गुलाबराव पाटील – सुदैवाने योग्य नियोजन केल्यामुळे आपल्याकडे शासकीय आणि खासगी या दोन्ही प्रकारातील उपचारांसाठी पुरेसे बेड उपलब्ध आहेत. याबाबत रूग्ण वा त्यांच्या आप्तांना सुलभपणे माहिती मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने अहोरात्र सुरू असणारा मदत कक्ष तयार केला असून येथे कुणीही कॉल करून बेडच्या उपलब्धतेची माहिती मिळवू शकतो. तर दुसरीकडे शासकीय पातळीवर आम्ही आधीच नियोजन करून ठेवले आहे. यात मोहाडी येथील महिला रूग्णालयात प्रारंभी १०० खाटांची उपलब्धता करण्यात आली असून याला ५०० बेडपर्यंत वाढविण्याची सुविधा देखील केली जात आहे. यामुळे बेडच्या उपलब्धतेसाठीचे अचूक नियोजन करण्यात आले आहे.

प्रश्न ​: रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचा तुटवडा असल्याची तक्रार होत असून याबाबत आपण काय कार्यवाही केली 

ना. गुलाबराव पाटील – कोरोना रूग्णसंख्या वाढू लागल्यानंतर रेमडेसिवीरच्या इंजेक्शनची मागणी सुध्दा वाढली. यामुळे जिल्हा प्रशासनाने याच्या वितरणाचे अधिकार आपल्याकडे घेतले असून स्वत: जिल्हाधिकारी महोदय हे यावर नजर ठेवून आहेत. यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने एक वॉर रूम देखील तयार करण्यात आली असून येथून गरजू रूग्णांना रेमडेसिवीर मिळते. १३ मार्चपासून ते आजवर जिल्हा प्रशासनाला ११२३७ इंजेक्शन्स मिळाले असून यापैकी १०,९७० चे वितरण करण्यात आले असून २३७ व्हायल्स बाकी आहेत. मुंबईच्या हाफकीन महामंडळाकडून जिल्ह्यास ६ हजार इंजेक्शन्स मिळणार असून याची ऑर्डर झालेली आहे. याचे सिव्हील हॉस्पीटल व शासकीय वैद्यकीय रूग्णालयात वितरण करण्यात येणार आहे. तर गौणखनिज प्रतिष्ठानतर्फे देण्यात आलेल्या ६६ लाख ५८ हजार रूपयांच्या निधीतून १९८० व्हायल्सचा पुरवठा देखील बाकी आहे. योग्य वापर महत्वाचा असून यामुळे रेमडेसिवीरचा तुटवडा भासणार नाही असा विश्‍वास आहे.

प्रश्न ​: लसीकरणाच्या तयारीसाठी आपण कोणते नियोजन केलेले आहे

ना. गुलाबराव पाटील – कोविडच्या प्रतिकारासाठी सर्वात महत्वाचे आयुध म्हणजे लसीकरण होय. राज्य सरकारने अलीकडेच सरसकट मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला असून लसीच्या उपलब्धतेनुसार ही अतिशय व्यापक मोहिम राबविण्यात येणार आहे. नागरिकांना कोणताही त्रास न होता कोविडची लस मिळावी यासाठीचे सुक्ष्म नियोजन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. जिल्ह्यात शक्य तितक्या लवकर लसीकरण सुरू व्हावे असा आमचा प्रयत्न आहे.

प्रश्न ​: जिल्हाभरात कोविड केअर सेंटर्सची सद्यस्थिती काय आहे 

ना. गुलाबराव पाटील – कोविडचा संसर्ग झाल्यानंतर समाजातील दात्यांनी समोर येऊन सढळ हाताने मदत केल्याने तालुका पातळीवर लोक सहभागातून कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. हाच पॅटर्न आता दुसर्‍या लाटेतही राबविण्यात आला आहे. पाळधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकसहभागातून अद्ययावत सुविधा असणारे उपचार केंद्र सुरू करण्यात आले असून याच प्रमाणे प्रत्येक तालुक्यात केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून याचा रूग्णांना लाभ झाला आहे.लोकसहभागातून मुख्यमंत्री सहायता निधीस मदत मिळत आहे.

प्रश्न: शिवभोजन थाळीचा सध्या गरजूंना उपयोग होत आहे का?

ना. गुलाबराव पाटील – नक्कीच होतोय. खरं तर आम्ही थाळी वाजवत नसून मोफत भोजनाची थाळी गरजूंना दिली आहे. पहिल्या लाटेत याचा कोट्यवधींना लाभ झाला होता. यामुळे मुुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी मोफत शिवभोजन थाळीची घोषणा केली असून जिल्ह्यात याची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात ३८ केंद्रांवरून ५१२५ थाळ्यांचे दररोज वितरण करण्यात येत आहे.

प्रश्न ​: कोविडच्या दुसऱ्या लाटेत कामगारांसाठी सरकारने काय केले आहे

ना. गुलाबराव पाटील – महाराष्ट्र इमारात व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत असणार्‍या जिल्ह्यातील १९,४३० कामगारांना पहिल्या संसर्ग काळात प्रत्येकी २ हजार, अलीकडे प्रत्येकी ३ हजार तर आता प्रत्येकी १५०० रूपयांची एकूण ८ कोटी ६५ लाख २० हजार रूपयांची मदत त्यांच्या थेट अकाऊंटमध्ये जमा करण्यात आली आहे.

प्रश्न: जिल्ह्यातील वीज समस्येचे निवारण करण्यासाठी आपण नेमके काय केले?

ना. गुलाबराव पाटील : शेतकर्‍यांना विजेचा नियमीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून यंदा विक्रमी २२ कोटी रूपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे. तर गत वर्षी १४ कोटी अशी ३६ कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. यात शिवारातील रोहित्रांसह ठिकठिकाणच्या वीज उपकेंद्रांचा समावेश आहे.

प्रश्न ​: जिल्ह्यातील नागरी भागांमधील विकासकामांबाबत आपण काय तरतूद केली

ना. गुलाबराव पाटील – ग्रामीण आणि नागरी भागातील विकासकामांमध्ये कोणताही दुजाभाव राहू नये याची आम्ही सातत्याने काळजी घेतली आहे. याचा विचार करता जिल्ह्यातील नागरी भागांसाठी अर्थात महापालिका व नगरपालिकांसाठी आम्ही नगरोत्थान योजनेतून १५ कोटी; दलीत्तेतरसाठी १५ कोटी तर नागरी दलीत वस्तीसाठी ३५ कोटी असा एकूण ६५ कोटींचा नियमित निधी प्रदान केला. यासोबत मार्च अखेरीस जिल्ह्यातील महापालिकेसाठी १४० कामांसाठी ४३ कोटी ४४ लक्ष ३६ हजार रूपयांचा निधी प्रदान करण्यात आला आहे. यात जिल्ह्यात अमळनेर, एरंडोल, पाचोरा, बोदवड, मुक्ताईनगर, जामनेर, भुसावळ, धरणगाव या नगरपालिकांच्या १३३ कामांकरीता सुमारे ४० कोटी निधी देण्यात आलेला आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरी भागासाठी तब्बल १४८ कोटींचा निधी नागरी विभागासाठी दिला. १०० कोटींची वाढीव तरतूद केल्यामुळे शहरी व ग्रामीण असा भेद ठेवला नाही. या माध्यमातून आम्ही नागरी विभागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रश्न ​: कोविडच्या आपत्तीत आपले खाते  असणाऱ्या पाणी पुरवठा व स्वच्छता खात्यातर्फे कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत

ना. गुलाबराव पाटील – गेल्या वर्षी प्रचंड भय आणि गोंधळाची स्थिती असतांनाही योग्य नियोजन केल्यामुळे राज्यात पाणी टंचाई भासू दिली नाही. यंदा देखील राज्यातील कुणीही व्यक्ती तहानलेला राहू नये याची काळजी आम्ही घेतली आहे. यासाठी प्रांताधिकार्‍यांना टँकर्सचे अधिकार देण्यात आले आहेत. जिल्ह्याचा विचार केला असता आम्ही अलीकडेच वाघ नगर परिसरासाठी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली आहे. याच प्रमाणे जिल्ह्यातील विविध गावांसाठी जल जीवन मिशनच्या माध्यमातून योजनांना गती देण्यात येणार आहे.

प्रश्न: कोविडच्या काळात राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांना नागरिकांना कितपत लाभ झाला आहे?

ना. गुलाबराव पाटील – राज्यातील महाविकास आघाडीच्या वाटचालीत सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू आहे. कोविडच्या आपत्तीत पहिल्या टप्प्यात मोफत धान्य वाटप करण्यात आले असून आता देखील याची घोषणा झाली आहे. याच्या अंतर्गत जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंतर्गत धान्य वाटपाचे नियोजन केले आहे. यासोबत  अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांने मे महिन्याचे धान्य मोफत दिले जाणार आहे. जिल्ह्यातील ५ लाख ८८ हजार १८ कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे.

प्रश्न ​: खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या काय उपाययोजना केल्या आहेत

ना. गुलाबराव पाटील – खरीप हंगामासाठी आम्ही मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढावा बैठक बोलावली आहे. यात खते आणि बियाण्यांबाबतचे नियोजन जाहीर केले जाईल. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना खते आणि बियाण्यांची कोणतीही टंचाई भासणार नाही याची ग्वाही आम्ही देत आहोत. यंदा कपाशीसाठी बीजी-२ याचे २६०५५२६ पाकिटे व देशी कापसासाठी ४४०७४ अशा एकूण २६५२६०० बियाण्यांच्या पाकिटांचे नियोजन करण्यात आले आहे. तर सोयाबीनसाठी २५००० पाकिटे उपलब्ध करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात यंदा एक गाव-एक वाण योजना राबविण्यात येत आहे. पीक विमा हा शेतकर्‍यांसाठी अतिशय महत्वाचा मुद्दा असून याच्या अंतर्गत २०१९-२० या वर्षात शेतकर्‍यांना २०८ कोटी ३४ लाख रूपयांचा लाभ मिळाला आहे. तर, पुर्नरचीत फळपीक विमा योजनेत ३६५ कोटी ८७ लाख रूपयांची भरपाई मिळाली आहे. तर २०२०-२१ या वर्षात १६२८५९ शेतकर्‍यांनी भाग घेतला असून २८.८२ कोटींचा शेतकरी हिश्शाचा भरणा करण्यात आला आहे. तर हवामानावर आधारित पीक विमा योजनेत १९५६२ शेतकर्‍यांनी १३ कोटी ६८ लाख रूपयांचा भरणा केला आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजेच शेतकऱ्यांना वरदान ठरत असलेलय पोकरा योजनेत जिल्ह्यातल्या ६० गाव समूहातील ४६० गावांची निवड करण्यात आली आहे. या योजनेत आतापर्यंत २०९३२ शेतकऱ्यांना १०७ कोटी ६२ लक्ष इतके अनुदान दिले असून  ११ शेतकरी गट आणि शेती उत्पादक कंपनीला १८२ कोटी ९२ लक्ष रूपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. या योजनेत निवड झालेल्या गावांमध्ये तंत्रज्ञानावर आधारित प्रात्यक्षिकांवर भर देण्यात येणार असून एक हजार हेक्टर पेरणी क्षेत्रावर अनुदान देण्यात येणार आहे.

प्रश्न: जिल्ह्यातील नागरिकांना आपण काय संदेश द्याल?

ना. गुलाबराव पाटील : कोविडचा आपण आजवर अतिशय धिरोदत्तपणे मुकाबला केला आहे. आता तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेऊन प्रशासन तयारी करत असून आपण याला सहकार्य करण्याची गरज आहे. शासनाने लावलेले कडक निर्बंध हे याचाच एक भाग असून या नियमांचे आपण पालन करावे हे आमचे कळकळीचे आवाहन आहे. यासोबत आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन नक्की लस घ्या. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लस घेतली तरी गाफील न राहता मास्क, फिजीकल डिस्टन्सींग आणि सॅनिटायझेशनचे पालन करा. आपल्या सर्वांच्या मदतीने एकत्रितपणे आपण कोविड विरूध्दचे युध्द जिंकणारच आहोत. आम्हाला फक्त आपली सक्षम साथ हवी इतकेच…!