⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2024

“शावैम” मध्ये नातेवाईकांना ऐनवेळी पुरविले पीपीई किट

0
GMC Jalgaon Recruitment 2022

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आज रविवारी १६ मे पासून नातेवाईकांना आत येण्यास पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे. मात्र सकाळी काही नातेवाईक रुग्णालयात जाण्यासाठी आग्रह करीत होते. अखेर पोलीस अधिकाऱ्यांच्या समन्वयातून अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना स्वतः: पीपीई किट पुरविले, तसेच काहींचे डबे रुग्णांपर्यंत पोचविण्यासाठी कर्मचारी देखील नियुक्त केले होते.

कोरोना महामारीची दुसरी लाट सुरु आहे. जिल्हाभरात असलेल्या कोविड रुग्णालयांत रुग्णांचे नातेवाईक भेटायला, जेवणाचे डबे द्यायला जातात. मात्र या नातेवाईकांमुळे बाहेर कोरोना संसर्ग पसरण्याची भीती असल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शनिवारी १५ रोजी आदेश काढीत कोविड रुग्णालयांमध्ये नातेवाईकांना जाण्यास बंदी केली आहे. तसेच जावयाचे असल्यास पीपीई किट घालून जावे असे आदेश दिले आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रविवारी जिल्हाधिकारी यांच्या आदेशापासून वंचित असलेल्या दाखल रुग्णांच्या नातेवाईकांनी सकाळी मात्र मुख्य गेट क्रमांक १ समोरच ठिय्या मांडून आत सोडावे म्हणून आग्रह सुरु ठेवला. यावेळी पोलीस बंदोबस्त देखील होता. प्रसंगी सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्याशी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी चर्चा करीत तोडगा काढला. आजच्या दिवशी म्हणून नातेवाईकांचे डबे रुग्णांपर्यंत पोचविण्यासाठी विशेष ८ कर्मचारी अधिष्ठात्यांनी नेमले. जनसंपर्क कक्षात असलेलया वॉर रूम मार्फत या कर्मचाऱ्यांनी वॉर्डात जाऊन रुग्णांपर्यंत डबे पोचविले. तसेच व्हिडीओ व साधा कॉल करून रुग्णांचे नातेवाईकांशी देखील बोलणे करून दिले.

तसेच ज्या नातेवाईकांना आत जायचे होते, त्यांना रुग्णालयातर्फे पीपीई किट दिले व ते त्यांनी घातल्यावर आत सोडण्यात आले. एकूण १२५ पीपीई किट दुपारी देण्यात आले. यावेळी सुरक्षा समिती अध्यक्ष डॉ. इम्रान पठाण, सदस्य विलास वंजारी, सुरक्षा निरीक्षक अजय जाधव, प्रकाश पाटील, वॉर रूममधील शिवकुमार पडदे यासह कर्मचाऱ्यांनी नातेवाईकांची मदत केली. परिस्थीतीवर पूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठी अधिष्ठाता डॉ. रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय उप अधीक्षक डॉ. संगीता गावित, डॉ. विजय गायकवाड, डॉ. हितेंद्र राऊत, डॉ. चेतन भंगाळे आदी दिवसभर लक्ष ठेऊन होते.

 स्वतंत्र किचन, पूर्ण सुरक्षा 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या किचनमधून दाखल सुमारे ३२२ रुग्णांना आयुष मंत्रालयाच्या तक्त्यानुसार सकाळी ८ वाजता नाश्ता, फळे, अंडी दिली जातात. दुपारी १२ वाजता व संध्याकाळी ६.३० वाजता जेवण देण्यास सुरुवात केली जाते. दोन वेळा चहा दिला जातो. या सर्व जेवणाचा दर्जा उत्तम राहण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात आली असून आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जेवण रुग्णांना पाठविण्यात येते. त्यामुळे रुग्णालयाचे किचन व जेवण हे पूर्णपणे सुरक्षित असून नातेवाईकांनी बाहेरून डबा देण्याचा आग्रह करू नये असे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले.

 नागरिकांना आवाहन 

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाईकांना भेटण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. तसेच, डबा देणे, रुग्णाच्या डिस्चार्जसाठी, मृत्यू झाला म्हणून बोलावण्यात आले असेल तर वॉर रूमशी नातेवाईकांनी संपर्क साधावा, पीपीई किट घालूनच यावे, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले आहे.

जळगाव जिल्ह्यातील अधिकृत कोरोना आकडेवारी : १६ मे २०२१

0
corona test

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२१ । जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसापासून कोरोना संसर्गाचा आलेख स्थिर आहे. आज रविवारी दिवसभरात ६३१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज ५७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.

जळगाव जिल्ह्यात तीन-चार आठवड्यांपासून दररोज आढळून येणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. रविवारी प्राप्त ६ हजार ०३७ चाचण्यांच्या अहवालातून ६३१ नवे रुग्ण समोर आलेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ३५ हजार १४२ झाली असून ७५५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख २३ हजार ०२९ झाला आहे.

दररोजच्या मृत्युंची संख्याही थोडी कमी झाली आहे. आज ११ जणांचा बळी गेला, त्यामुळे बळींचा एकूण आकडा २४१७ वर पोचला आहे.

जळगाव शहर ३४, जळगाव ग्रामीण ३१, भुसावळ ५४, अमळनेर ३३, चोपडा १९, पाचोरा ५२, भडगाव ००, धरणगाव ३६, यावल १५, एरंडोल २३, जामनेर १४५, रावेर ३२, पारोळा ३८, चाळीसगाव ६९, मुक्ताईनगर ९, बोदवड ३६, अन्य जिल्ह्यातील ५.

तसेच जिल्ह्यामध्ये ०७ मृत्यू हे SARI, COVID NEGATIVE, PNEUMONIA, COVID SUSPECT, POST COVID यामुळे झालेले आहेत.

अंध बांधवांना नेहरू चौक मित्र मंडळातर्फे किराणा वाटप

0
jalgaon

जळगाव येथील नेहरू चौक मित्र मंडळातर्फे अंध बांधवांना मदत म्हणून रविवारी १६ मे रोजी किराणा वाटप करण्यात आला. कोरोना महामारीमुळे अंध बांधवांना सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम घेण्यात आला.

शहरातील १७ अंध बांधवांच्या परिवाराला घरी जेवणाच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. कोरोना महामारीमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती देखील बेताची होती. यातील काही परिवार हे रेल्वेत खेळणी विकून उदरनिर्वाह करतात.  अशावेळी नेहरू चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी यांना हि बाब माहित झाली. त्यांनी तातडीने दोन दिवसात व्यवस्था करीत रविवारी या १७ अंध परिवाराला एक महिन्याचा किराणा वाटप केला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी, विशाल पटेल, तुषार पटेल, सागर मंधान, पियुष गांधी, अभिजित भावासार, जगदीश जोशी, तुषार पटेल, योगेश पाटील, अमोल भावसार, राजू भावसार,रिंकेश गांधी,पंकज पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रसंगी सुकलाल शिंदे, गणेश तेली, सुरेश पाटील, कैलास ठोमरे, नारायण महाजन, निवृत्ती डोरसे, समाधान हरसोळे, ज्ञानेश्वर गुरव, पंडित हरसोळे, दगडू पाटील, सुनीता बोरसे, युवराज चौधरी, नारायण सोनवणे, विठल पाटील, महेंद्र वानखेडे, मंगलाबाई पाटील, दीपक सोनवणे यांच्या परिवाराला मदत झाली. यावेळी विशाल पटेल, योगेश पाटील, दीपक खैरनार, मुकेश महाराज यांचे सहकार्य लाभले.

सावदा येथील “त्या” रेशन दुकानाची तपासणी ; नागरिकाकडून अनेक तक्रारी प्राप्त

0
retion

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२१ । सावदा येथील एका रेशन दुकानदारा कडून रेशन घेण्यास येणाऱ्या नागरिकांना अरेरावी तसेच धान्य कमी देणे, थंब घेऊन धान्य न देणे  अश्या अनेक तक्रारी येत होत्या. मात्र पुरवठा विभागा कडून सतत दुर्लक्ष केले जात होते याबाबत वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.

वृतपत्रात वृत्त प्रकशित झाल्यावर दी 16 रोजी या चांदेलकर नामक रेशन दुकानाची तपासणी तहसीलदार उषारानी देवगुणे यांचे आदेशानुसार करण्यात आली, यावेळी पुरवठा विभागाचे पवार, तसेच सावदा तलाठी पाटील यांनी येथे तपासणी केली असता थंब मशीन बंद होते, मागील स्टॉकचा हिशोब लागत नव्हता, रेशन नागरिकांना वेळेत वाटप होत नव्हते, दुकानदार मात्र आलेल्या नागरिकांशी अरेरावी करीत असत अश्या अनेक त्रुटी यावेळी आढळून आल्या.

दरम्यान तेथे उपस्थित नागरिकांनी देखील याबाबत तक्रारी केल्या, व तसे लेखी निवेदन देखील दिले, तसेच या दुकानास दोन वॉर्ड जोडले असून एक वॉर्ड अगदी शहराच्या दुसऱ्या टोकाकडील असून यानागरिकाना विशेषत: वयोवृद्ध नागरिकांना दूर जाण्यासाठी त्रास होत असून त्यातच सदर दुकानदार दुकान कधी सुरु तर कधी बंद अश्या मनमर्जिने वागत असल्याने या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, अश्या तक्रारी या निवेदनात नागरिकांनी दिल्या सदर निवेदन तपासणीस आलेल्या कर्मचारी यांनी स्वीकारुंन तसा अहवाल तयार करून तो तहसीलदार यांचेकड़े पाठविन्यात येणार असून यावर आता तहसीलदार काय कार्यवाही करता? याकडे नागरिकांचे लक्ष असून सदर दुकानदारास नेहमी प्रमाणे फक्त नोटिस दिली जाते का त्याचा परवान काही दिवसा साठी निलंबित होतो का? कायमस्वरूपी कमी केला जातो हे समजेल पण नागरिकांना त्यांना मिळणारे धान्य पूर्ण, मिळावे, ते चांगल्या प्रतीचे मिळावे व वेळेत मिळावे अशी अपेक्षा केली जात असून, दरम्यान आज सकाळी धान्य घेण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती यावेळी सावदा पो,स्टे, चे, स,पो,नी, देवीदास इंगोले यांनी वेळीच जाऊन बंदोबस्त ठेवला.

त्याचसोबत दर महिन्यास गहु कमी करून त्या ऐवजी देण्यात येणार मका नागरिकांना काही कामी येत नसून त्याची प्रत देखिल अतिशय खराब येत असून त्यामुळे मका ऐवजी गहु जास्त मिळावे अशी देखील नागरिकांची मागणी असून सोबत माणशी किती धान्य मिळते व या महिन्यात कोणते धान्य आले आहे याचा फलक दुकानावर असावा अशी देखील मागणी नागरिक करीत आहे

कुंभार खेड्यात मृत्यूचे तांडव ; 21 दिवसांत 24 जणांचा मृत्यू

0
kumbarkheda

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२१ । सध्या कोरोनाची दुसरी लाट ही अतिशय घातक सिद्ध झाली आहे. सर्व सामान्य माणसाच्या जीवनात मोठं संकट उभे करत आहेत, या लाटेत खूप मोठ्या प्रमाणात युवा महिला पुरुष मरण पावत आहेत. याचं पार्श्वभूमीवर रावेर तालुक्यातील कुंभारखेडा गावांत ही मृत्यू दर दिवसेंदिवस वाढत असून गेल्या महिन्यात सुमारे 24 महिला- पुरुष यांचें अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुंभारखेडे येथे असे एकामागोमाग एक अशी जणू मृत्यू शुखंलाचं गठीत करण्यात आली आहे कि काय ? असे वाटत असून सर्व कुंभार खेडा गावकऱ्यांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे, संबंधित गांवकरी मृत्यूच्या  सावटाखाली जीव मुठीत धरून दिनचर्या पार पाडीत आहेत. यामुळे कोणीही कुणाच्या द्वार दर्शनासाठी जात नाही, तसेच मयताचे भाऊबंद , नातेवाईक, मित्र मंडळी सदर मयताच्या कुटुंबातील सदस्यांना सांत्वनासाठी सुध्दा पुढे येण्यासाठी धजत नाहीत, व

तेही  खूप दूरवर  चे अंतरावर आहेत यासारखे वागत आहेत. कुटुंबातील  कर्ती व्यक्ती अचानक सोडून जात असल्याने मयताच्या कुटुंबातील सदस्यांची अवस्था एकदमच पोरकी मानसिकता तयार होत आहे. यामुळे मयताच्या कुटुंबातील सदस्यांना माणसातील माणुसकी एक प्रकारे संपलेली आहे, यांचें प्रत्ययास  येत आहे.

काही दिवसांपूर्वी प्राथमिक शाळेत कोरोना लसीकरण मोहीमेला सुरूवात झाली पण त्याचा लाभही आसपासच्या गावातील लोकांनी परस्पर लसीकरण करून घेतलं. गावात लसीकरण मोहीम विषयी साधी माहिती दिली गेली नाही. याबाबत मार्गदर्शन, जागरुकता निर्माण करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना होत नाही. यामुळे गावात पुढच्या दिवसांत अजून कोरोनाचा कहर नक्कीच वाढेल याविषयीची शंकाच नाही म्हणून कुंभारखेडा गावातील नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी स्थानिक प्रशासनाने ठोस पाऊले उचलावीत अशी मागणी  जोर धरू लागली आहे.

झाड कोसळल्याने अमळनेर तालुक्यात दोघं बहिणींचा मृत्यू

0
achalkheda

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२१ । ‘तौत्के’ चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवायला सुरुवात झाली असून जळगाव जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी वादळासह पावसाच्या सरी कोसळ्या. या दरम्यान, आज दुपारी अमळनेर तालुक्यातील अंचलवाडी येथे वादळामुळे खळ्यातील झोपडीवर चिंचेचे झाड कोसळून दोघ बहिणीचा दबल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. ज्योती बारेला (१६) आणि रोशनी बारेला (१०) असे दोघा बहिणींचे नावे आहे.

याबाबत असे की, रणाईचे येथे राजेंद्र भीमराव पाटील यांच्या शेतात सालदरकी करण्यासाठी आलेल्या बल्लू बारेला याने गावाबाहेर खळ्यात स्वतःची झोपडी तयार केली होती. आज रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक जोरात वादळ आणि पाऊस सुरू झाला. काही कळण्याच्या आत खळ्यात असलेले चिंचेचे झाड कोसळले. त्यात बल्लूची झोपडी दाबली गेली. त्याची मोठी मुलगी ज्योती बारेला  आणि रोशनी बारेला या दोन्ही बहिणी झाडाखाली दाबल्या जाऊन त्यांचा मृत्यू झाला.

 

ताबडतोब गावातील सरपंच भगवान बवल पाटील , रंगराव पाटील , गोपाळ मुरलीधर पाटील यांच्यासह गावातील ग्रामस्थ तरुण मदतीला धावून आले. संपूर्ण घर दाबले गेल्याने झाड कापून मुलींना व घरचे समान काढण्याची प्रक्रिया सुरू होती.

जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी

0
rain in jalgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२१ । अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, या चक्रीवादळामुळे राज्यातील तापमानात काहीसा घट झाली आहे. जळगाव जिल्ह्यात काही भागात काल शनिवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. तर आज देखील जिल्ह्यात बहुतांशी अंशतः ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी तुरळक पाऊस देखील झाला आहे. यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

‘तौत्के’ या चक्रीवादळाचा राज्यातील वातावरणावर परिणाम झाला असून गेल्या दोन दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी अंशतः ढगाळ वातावरण आहे. जळगाव जिल्ह्यातील तापमानातही काहीसा घट झाली आहे. त्यामुळे जळगावकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. काल शनिवारी जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. तर आज सकाळपासून अंशतः ढगाळ वातावरण आहे.

यंदा मार्च महिन्यापासूनच जिल्ह्याच्या तापमानात वाढ होत असल्याने जिल्हावासीयांना उकाडा सहन करावा लागत आहे. परंतु राज्यातील हवामानात बदल होत राहिल्याने जिल्ह्यातील तापमानात घट देखील झाली होती. परंतु आठवड्याभरापासून जिल्ह्यच्या तापमानाने पुन्हा मुसंडी मारल्याने जिल्ह्याचे तापमान 40 अंशापेक्षा अधिक नोंदविले जात आहे.

फापोरे खु. जवळील बोरी नदीवरील बंधाऱ्याचे आ. अनिल पाटलांच्या हस्ते भूमीपूजन

0
amalner

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२१ । अमळनेर तालुक्यातील फापोरे बु ग्रामस्थांच्या मागणीला प्रतिसाद देत आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नातून बोरी नदीवर मृद व जलसंधारणा विभाग महामंडळ अंतर्गत फापोरे खु. गावाजवळ अजून एक साठवण बंधारा मंजूर करण्यात आहे.

या बंधाऱ्यास 1 कोटी 30 लाख रुपये निधी मंजुर झाला असून काल फापोरे बु. येथील गावकऱ्यांच्या उपस्थित आमदार अनिल भाईदास पाटील यांनी भूमीपूजन केले. तसेच या अगोदर हिंगोणे गावाजवळ काम सुरू असलेल्या साठवण बंधारा देखील पूर्ण झाला असून निधी वर्ग होणे बाकी आहे.

तरी या साठवणा बंधाऱ्याचा येणाऱ्य काळात बोरी काठावरील गावांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल व पुन्हा बोरी परिसर सुजलाम सुफलाम होईल अशी आशा परिसरातील गांवामधील नागरिक व्यक्त करित आहेत. ह्या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादीचे सुरेश पाटील, एल टी पाटील, तसेच फापोरे येथिल जेष्ठ नागरीक भालेराव पाटील, बाबुराव पाटील, बाळासाहेब पाटील, राजू दादा फापोरेकर, प्रताप पाटील, प्रकाश पाटील, सुरेश पाटील, जितेंद्र पाटील, उपसरपंच दिनेश पाटील ग्रा.पं सदस्य नरेंद्र पाटील, अनिल पाटील, भिकाजी पाटील, गणेश पाटील, शिवराम गायकवाड आदी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

पोलीसात तक्रार दिल्याच्या रागातून तरुणावर तलवारीने हल्ला : तीन जणांविरोधात गुन्हा

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२१ । तरूणाने पोलीसात तक्रार दिल्याच्या रागातून तीन जणांनी तलवारीने हल्ला करून गंभीर जखमी केल्या घटना जळगाव तालुक्यातील आसोदा येथे घडलीय. विजय एकनाथ घुले (वय-३८) असे हल्ला केलेल्या तरुणाचे नाव असून याबाबत तालुका पोलीसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, विजय घुले यांनी गावातील जितेंद्र बाबुराव देशमुख याच्या विरूध्द जुन्या वादातून जिल्हापेठ पालीसात तक्रार दिली होती. याचा राग मनात ठेवून जितेंद्र देशमुख सह योगेश डिगंबर कोल्हे आणि भरत बाळू पाटील सर्व रा. आसोदा ता.जि.जळगाव यांनी शुकवार १४ मे रोजी दुपारी १ ते १.१५ वाजेच्या सुमारास विजय घुले यांच्यावर तलवार हल्ला करून जखमी केले.

तर लोखंडी रॉड आणि दांडक्याने बेदम मारहाण केली. शनिवारी सायंकाळी विजय घुले यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीसात तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउनि कल्याण कासार करीत आहे.