जिल्हा बँक निवडणुकीतून भाजपची माघार
जळगाव लाईव्ह न्यूज । 8 नोव्हेंबर २०२१ । जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय घडामोडीना वेग आला आहे. भाजपकडून उमेदवारी दाखल केलेल्या अनेक दिग्गज नेत्यांचे उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर आता भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे जाहीर करत आमचे सर्व उमेदवार उमेदवारी अर्ज माघारी घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे महाविकास आघाडीचा विजयाचा मार्ग सोपा झाला आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी दि.११ ऑक्टोबरपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याला सुरूवात झाली होती. त्यानंतर उमेदवारी अर्जाची छाननी होऊन भाजपचे उमेदवार खासदार रक्षा खडसे, माजी आमदार स्मिता वाघ यांसह अनेक दिग्गज उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते. यामुळे भाजपाला या निवडणुकीत चांगलाच धक्का बसला होता.
दरम्यान, भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे जाहीर करत आमचे सर्व उमेदवार हे अर्ज माघारी घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपच्या या बहिष्कारामुळे महाविकास आघाडीचा विजयाचा मार्ग सोपा झाला आहे. दरम्यान, या बॅंकेत केवळ राजकारण सुरू असून शेतकऱ्यांच्या हिताला काळे फासले जात असल्याचा आरोपही माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.