जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२१ । जळगाव शहर महानगरपालिकेतील राजकारण दिवसेंदिवस चांगलेच तापत असून भाजप-शिवसेना आणि बंडखोर नगरसेवक यांच्यातील वाद टोकाला पोहचला आहे. बंडखोर नगरसेवकांवर कारवाईसाठी प्रयत्न सुरू असतानाच प्रभाग समिती निवडणुकीत व्हीप नाकारल्याने भाजपच्या त्या २७ नगरसेवकांना नोटीस बजावण्यात आली आहे.
जळगाव महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांना गळाला लावत शिवसेनेने आपली सत्ता स्थापन केली आहे. भाजपातून बंडखोरी करून शिवसेनेला मदत करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी यासाठी विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. त्या याचिकेवर अद्याप सुनावणी सुरू आहे.
नुकतेच पार पडलेल्या प्रभाग समिती सभापती निवडणुकीत भाजप नगरसेवकांना व्हीप बजावले होते. दरम्यान, पक्षाच्या व्हीपचे उल्लंघन केल्याने ‘त्या’ २७ नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी गटनेते दिलीप पोकळे, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी याचिका दाखल केली होती. दरम्यान, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी २७ नगरसेवकांना नोटीस बजावली आहे. भाजपच्या २७ नगरसेवकांना आपले म्हणणे मांडण्यासाठी ७ दिवसांचा कालावधी देण्यात आला असून म्हणणे सादर न केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, भाजप नगरसेवक भगत बालाणी यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता मी सध्या बाहेरगावी असून नोटीस बाबत काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.