⁠ 
शनिवार, मे 4, 2024

बिस्कीट पुड्याचे आमीष , ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, अवघ्या १७ दिवसात तपास आणि ६०व्या दिवशी जन्मठेपेची शिक्षा

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२२ । चाळीसगाव तालुक्यातील ४ वर्षीय चिमुकलीला बिस्कीटचे आमीष देत तिच्यावर सावळाराम भानुदास शिंदे वय-२७ या नराधमाने अत्याचार केला होता. पोलिसांनी अवघ्या १७ दिवसात तपास पूर्ण करीत न्यायालयात दोषारोप दाखल केले. न्यायालयात जलदगतीने खटला चालवून अवघ्या ६० दिवसात सुनावणी पूर्ण करण्यात आली आणि आज न्या.एस.एन.माने-गाडेकर यांनी नराधमाला आजन्म कारावास व आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने पीडित मुलीला मनोधैर्य योजनेंतर्गत ३ लाख रुपये यापूर्वी मदत दिली आहे. तसेच आरोपीच्या दंडापैकी ५० टक्के रक्कम आणि विक्टिम कॅम्पेनसेशन फंड अंतर्गत १० लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

चाळीसगाव तालुक्यातील एका ४ वर्षीय चिमुकलीला दि.२७ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास आरोपी सावळाराम भानुदास शिंदे वय-२७ वर्ष रा. मानसिंगका कॉलनी पाचोरा ता.पाचोरा जि. जळगाय मुळ गाव लढरे ता. नांदगाव जि.नाशिक हा बिस्कीटचा पुडा खायला घेवून येतो असे सांगुन घेवून घेऊन जात त्याने त्याने तिच्यावर लैगिक अत्याचार केला होता. मुलीच्या आईचे फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी गु.र.नं. 437/2021 भा.द.वि.क. 363,366(अ),376 (अव), बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम कलम 3 (अ), 4,5 (म) (न), 6,8,9 (आय) (म) (न), ब 10 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हयाचा प्राथमीक तपास सहा. पोलीस निरीक्षक विशाल टकले चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन यांनी केला असून गुन्हयात आरोपी सावळाराम शिंदे यास तात्काळ अटक करण्यात आली होती. गुन्हयाचे गांभीर्य पाहता पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे साहेब यांनी पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव उप विभाग कैलास गावडे यांचेकडे वर्ग केला होता. गुन्हयात चाळीसगाव शहर पोलीसांनी आरोपी व पिडीत मुलीचे कपडे व अंगावरील सॅम्पल तात्काळ प्रयोगशाळेत पाठवुन डी. एन. ए. अहवाल प्राप्त करून गुन्हयाचा तपास अवघ्या १७ दिवसात तपास पुर्ण करीत विशेष न्यायालय श्रीमती एस. एन.माने-गाडेकर यांच्या न्यायालयात दोषारोप पत्र केले होते.

त्यानंतर पोलीस अधिक्षक जळगाव डॉ.प्रविण मुंढे यांनी जिल्हा सरकारी वकील ऍड.केतन ढाके यांचेमार्फत विषेश न्यायालयास सदर गुन्हयाचा खटला जलदगतीने चालविण्यात यावा अशी विनंती केली होती. विषेश न्यायालयाने हा खटला जलदगतीने चालवुन ६० दिवसात सुनावणी पुर्ण करून आज दि.१६ फेब्रुवारी रोजी निकाल दिला आहे. न्यायालयाने आरोपी नामे सावळाराम भानुदास शिंदे यास आजन्म कारावास व २ लाख आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली आहे.

गुन्हयाचा तपास पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक चाळीसगाव रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी कैलास गावडे, उप विभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव उपविभाग, सहा. तपासी अधिकारी विशाल टकले सहा.पोलीस निरीक्षक, पो.ना.राकेश पाटील, पो.ना.राहुल सोनवणे, म.पो.हे कॉ. विमल सानप, म.पो.कॉ.सवा शेख यांनी केला असून खटल्याचे कामकाजात पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कोर्ट पो.कॉ.दिलीप सत्रे यांनी मदत केली आहे. खटल्यामध्ये जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी कामकाज पाहीले आहे. नमुद गुन्हयात दोषारोप पत्र दाखल झाले पासुन ६० दिवसात निकाल लागुन आरोपीस शिक्षा झाल्याने पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी वरील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.

पहा थेट व्हिडिओ :

हेही वाचा :