⁠ 
शनिवार, मे 4, 2024

अरे देवा, शेतकऱ्यांकडून पीक पाहणीसाठी २०० रुपयांची लाच! वाचा काय घडले

जळगाव लाईव्ह न्यूज | १७ ऑक्टोबर २०२३ | निसर्गाच्या लहरीपणामुळे प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांने मोठ्या प्रमाणात नुकसान होते. दुसरीकडे बियाणे, खते, किटकनाशकांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. कसेबसे करुन पिक हाती आले तर बाजारात त्याला योग्य किंमत मिळत नाही. या दृष्टचक्रात भरडून शेतकरी पार मेतकुटीला आला आहे. अशात पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांकडून दोनशे रुपयांची लाच मागितल्याचे प्रकरण जळगाव जिल्ह्यात समोर आले आहे.

जळगाव तालुक्यातील चौगाव येथील तलाठी कार्यालयात चंद्रभान रतिलाल बाविस्कर हे कोतवाल म्हणून कार्यरत आहेत. तेथील तलाठ्याने तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांचेकडे कोतवाल चंद्रभान रतिलाल बाविस्कर यांच्याविरोधात तक्रार केली, की कोतवाल बाविस्कर मुलगा सचिन चंद्रभान कोळी ई-पीक पाहणी अॅपद्वारे ई-पीक पाहणी लावून देण्यासाठी शेतकरी खातेदार यांचेकडून दोनशे रुपयांची मागणी करत असल्याबाबतचा अहवाल कार्यालयात सादर केला.

याबाबत लाचेची मागणी करत असलेला एक ऑडिओ रेकार्डींग त्यांच्या मोबाईलवर प्राप्त झाला असून, पैश्यांच्या मागणीबाबत तलाठी यांनी स्वतः खात्री केली असून, चंद्रभान बाविस्कर यांचा मुलगा सचिन कोळी हा बेकायदेशीरपणे पैशांची मागणी करत असल्याबाबत अहवालात नमूद केले आहे. कोतवाल चंद्रभान बाविस्कर यांनी ई-पीक पाहणीच्या कामात टाळाटाळ व अक्षम्य दुर्लक्ष केले आहे, असा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

यावरून बाविस्कर हे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करीत नाही. त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या प्रकरणी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी आदेशान्वये चंद्रभान रतिलाल बाविस्कर यांना पुढील आदेश होईपर्यंत निलंबित केले आहे. चंद्रभान बाविस्कर यांना निलंबन कालावधीत कोणतेही मानधन देण्यात येणार नाही.