जळगावातील दुचारी चोरणारी टोळी जेरबंद, २० दुचाकी जप्त
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२२ । जिल्ह्यातील दुचाकी चोरी करणारी टोळीला मलकापूर पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून तब्बल २० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पुन्हा मोटारसायकल चोरीची अनेक प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
मलकापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिनव त्यागी व पोलीस निरिक्षक विजयसिंग राजपूत यांनी मोटारसायकलांच्या टोळीला अटक करण्यात आल्याची माहिती दिली. या टोळीकडून २० दुचाकी जप्त करण्यात आल्या असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व जण जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असून प्रमुख सूत्रधार हे मुक्ताईनगर तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती देखील याप्रसंगी देण्यात आली.
आकाश उर्फ संतोष रावळकर आणि रामशंकर मनोहर भोलवणकर यांच्याकडे विना क्रमांकाची दुचाकी दिसून आल्याने मलकापूर पोलिसांच्या गोपनीय शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी पवन संजय जवरे, संतोष समाधान कवळे, अमरदीप बाबुराव उबाळे आणि प्रशांत समाधान बोरले हे त्याचे साथीदार असल्याची माहिती दिली. यानुसार या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती अभिनव त्यागी यांनी दिली. या टोळीच्या तपासातून मोटारसायकल चोरीची अनेक प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता आहे.